अहमदनगर

शिक्षक बँकेत फोडाफोडी, बंडखोरी अन् प्रवेश सोहळ्यांतून प्रतिमा मलीन?

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा: शिक्षक बँकेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली, तशा सर्वच मंडळांमध्ये राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. तत्त्व आणि निष्ठेच्या गप्पा मारणारे शिक्षक उमेदवारीसाठी अक्षरशः राजकीय कोलांटउड्या मारत आहेत. तर, स्वाभिमान अन अभिमानाचे धडे देणारे शिक्षक नेते देखील बंडखोरी करून आलेल्या आयारामांंचे थाटामाटात प्रवेश सोहळे करताना दिसत आहे.

या विसंगत चित्रामुळे शिक्षक बँकेची निवडणूक व 'ती' नेतेमंडळीही चर्चेत आली आहे. दरम्यान, प्रत्येक तालुक्यातून एका जागेसाठी 30 पेक्षा अधिक इच्छूक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे इच्छुकांची उमेदवारी घेण्यासाठी सत्त्वपरीक्षा, तर उमेदवारी देण्यासाठी नेत्यांची मात्र चांदी होणार असल्याचीही चर्चा आहे.

शिक्षक बँकेची अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 जूनपासून सुरू होत आहे. तर 24 जुलैला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच मंडळांनी तालुकानिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, प्रत्येक तालुक्याला जागा एक अन इच्छुक अधिक असल्याने सर्वच मंडळांच्या नेत्यांची काहीशी डोकेदुखी वाढणार आहे. यात, अनेक शिक्षक हे उमेदवारीसाठी मंडळे बदलत आहेत.

यात, प्रारंभीच राहुरीत 'गुरुजीं'नी दोन पदाधिकारी फोडून 'डॉक्टर'लाच इंजेक्शन टोचले. तर, श्रीगोंद्यातूनही पूर्वाश्रमीची 'सदिच्छा' सोबत घेऊन स्वतःला 'चाणक्य' समजणार्‍यांही झटका दिला. संगमनेरातही बंडखोरांना पायघड्या टाकल्या. मात्र, पाथर्डीत हा डाव फसल्याची चर्चा आहे. या ठिकाणी एकाच दगडात दोन पक्षी निशाण्यावर होते. मात्र, खबर लिक झाली आणि रात्री साडेतीन वाजता 'त्या' नेत्याने नाराज पदाधिकार्‍याचे घर गाठून मंडळ सोडू नका, माझ्या 'सदिच्छा' तुमच्या सोबत असल्याचा शब्द दिला.

त्यानंतर हा प्रवेश बारगळला. याशिवाय अन्य मंडळांनीही 'तगडे' उमेदवार गळाला लावण्यासाठी फासे फेकले आहेत. श्रीरामपुरात हे फासे थोडक्यात हुकल्याची चर्चा आहे. कोपरगावातही काही इच्छुक बंडाच्या तयारीत दिसत आहे. तर, राहुरीतून शब्द मिळालेला असतानाही अनेकांना शेवटच्या क्षणी थांबावे लागणार असल्याने येथेही आतापासूनच गोंधळ सुरू झाला आहे.

एकूणच, शिक्षक मंडळांतही बंडोबा डोके वर काढताना दिसत आहे. त्याचा निवडणुकीच्या दरम्यान सर्वच मंडळांना मोठा फटका बसणार आहे. विशेष म्हणजे 'गुरुजी, डॉक्टर आणि बापूं'च्या उच्च विचारांचे लोकं बँकेच्या सत्तेसाठी कशाप्रकारे राजकारण करतात, याकडे शिक्षक सभासदांसह आम जनतेचेही लक्ष आहे.

गेल्यावेळी तेलही गेलं अन् तूपही!

गेल्या निवडणुकीत उमेदवारीसाठी 'मागणी' पूर्ण करुनही शेवटच्या क्षणी तेलही गेलं आणि तूपही गेलं, अशी अवस्था काहींची झाली होती. हा अनुभव असल्याने कुणीही अगोदरच 'मागणी' पूर्ण करण्याचे धाडस दाखवित नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी 'लाखमोलाचे' योगदान देऊनही उमेदवारी न मिळाल्याने 'ते' इच्छुक 'त्या' नेत्यांकडे आपले 'योगदान' परत घेण्यासाठी आजही तगादा लावत आहेत.

निष्ठावंतांमध्ये धुसफूस; नाराजी भोवणार

ज्यावेळी मंडळ अडचणीत होते, त्यावेळी अनेकांनी प्रामाणिक काम केले. मात्र, आज निवडणुकांमध्ये या निष्ठावंतांना न्याय देण्याऐवजी उमेदवारीसाठी स्वतःच्या मंडळांला सोडून आलेल्या आयारामांचे लाड पुरविण्यातच नेतेमंडळी व्यस्त दिसत आहेत. यातून अंतर्गत धुसफूस वाढू लागली आहे. येणार्‍या काळात अनेक मंडळांना ही नाराजी भोवणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT