देवदैठण : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदे तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथे अवघ्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या डागडुजी करण्यात आलेल्या खोल्यांवरील पत्रे वादळी वार्याने उडाले. त्यामुळेे ज्ञान मंदिराच्या कामातही झालेला निकृष्टतेचा कळस पाहायला मिळाला आहे.
पिंप्री चौफुला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जुन्या खोल्या मोडकळीस आल्या होत्या. शिक्षकांच्या मागणीवरून शाळेची डागडुजी आणि नवीन पत्रे टाकण्याचा ठराव ग्रामपंचायतने घेतला. त्यावर सुमारे अंदाजे दोन लाख रुपये निधीही मिळाला.
दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतच्या वतीने शाळा खोल्यांची डागडुजी झाल्याने ग्रामस्थ व पालकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्याने शाळेवरील पत्रे उचकटले गेले.
डागडुजी केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच इमारतीची झालेली ही अवस्था पाहता, ज्ञान मंदिराच्या कामातही निकृष्टतेचा कळस उघडकीस आला आहे. शाळेवरील पत्रे उडाल्याने मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायतने पुन्हा पत्रे पूर्ववत करून डागडुजी केली आहे.
त्यामुळे तूर्तास तरी धोका टळला आहे. मात्र, संबंधित ठेकेदार आणि पदाधिकारी यांनी ठरलेल्या निविदेप्रमाणे काम केले आहे का, याची संबंधित विभागाने चौकशी करावी. दरम्यान, कामाची चांगली दुरुस्ती न झाल्यास श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा नानासाहेब बोबडे, लीलाधर ओहोळ, सचिन ठुबे, अविदास ओहोळ, संतोष ओहोळ, दादाभाऊ सकट, काकासाहेब कारंडे, महेंद ओहोळ आदींनी दिला आहे. दरम्यान, श्रीगोंदा पंचायत समितीला स्थानिक ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत इशारा दिला आहे. त्यामुळे निश्चितच चांगले काम होईल, अशी अपेक्षा आहे.