

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : यंदाचा गणेशोत्सव अपूर्व उत्साहात आणि प्रचंड जल्लोषात होणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या गणेशोत्सवात नेत्यांमधील ईर्ष्या टोक गाठणार आहे. त्याचबरोबर मंडळांचा कलही स्पष्ट होणार आहे. कोट्यावधींची उधळण तर होईलच. त्याचबरोबर नेत्यांची ईर्ष्या पणाला लागेल.
2019 मध्ये महापुराने थैमान घातले. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. त्यानंतरच्या सलग दोन वर्षांत कोरोनामुळे उत्सवावर निर्बंध आले. तीन वर्षांच्या खंडानंतर यंदाच्या उत्सवात प्रचंड जल्लोष असेल. तरुणाईने तीन वर्षांपासून रोखून धरलेल्या जल्लोषाला यंदा झळाळी येईल.
मंडळांच्या भूमिकाही स्पष्ट होतील. कोणाचा कल कोणाकडे, हे यातून दिसून येईल. शहरात महापालिका निवडणुका असल्यामुळे मंडळांना स्थानिक पातळीवर प्रायोजक मिळविणे सोपे जाणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, अन्यत्र नगरपरिषदांच्या निवडणुका असल्याने जिल्हाभर उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण असणार आहे.
गणेशोत्सव दिवसेंदिवस खर्चिक होत चालला आहे. नामवंत बँड, आरास आणि रोषणाई हे चित्र आता मागे पडले आहे. डॉल्बी सिस्टीम, लेसर यामुळे हजारोंचा खर्च आता लाखात गेला आहे. केळीचे खुंट आणि फुलांची सजावट करून निघणारे गणपतीचे रथ आता डिजिटल युगात रोषणाईने झगमगत आहेत. मात्र, या सर्व झगमगाटाला येणारा खर्चही मोठा आहे. त्यासाठी प्रायोजक शोधणे हे मंडळांसमोर नेहमीच आव्हान असते.
यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगले प्रायोजक मिळतील. तीन सदस्यांचा एक प्रभाग झाल्यामुळे जुन्या एकेका प्रभागात मंडळे इच्छुकांशी संपर्क साधतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्ह्यातील निवडणुकांमुळे महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मंडळांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळेल. यातूनच त्यांच्यातील ईर्ष्या टोक गाठेल. त्याचबरोबर गणेशोत्सवात नावीन्य आणण्यासाठी नेहमीच्या मंडळांनी आतापासूनच तयारी केली आहे.
कोल्हापुरातील काही गर्दी खेचणार्या मंडळांच्या पदाधिकार्यांशी काही नेते आतापासूनच संपर्कात आहेत. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर लोकप्रिय असणार्या मंडळांची प्रायोजक मिळविण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात जल्लोेष
यंदाचा गणेशोत्सव नेहमीपेक्षा निश्चितच वेगळा असेल. तीन वर्षांच्या साचलेल्या जल्लोषाला तरुणाई मुक्तपणे वाव करून देईल. त्यामुळे आकर्षक देखावे आणि गर्दी खेचणार्या मिरवणुका या वैशिष्ट्यांमध्ये नव्याने काही भर टाकण्यासाठी काही मोठ्या मंडळांचे पदाधिकारी आतापासूनच प्रयत्न करत आहेत, तर या माध्यमातून नेत्यांनाही जनतेशी संपर्क साधता येणार आहे.