नगर : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागात शेती व्यवसायात बालकामगारांचे प्रमाण पूर्वी मोठ्या प्रमाणावर होते. ही समस्या आता कमी झाल्याचे चित्र दिसत असून, अन्य क्षेत्रात सुध्दा बालकामगार प्रथा बंद होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर वें. यार्लगड्डा यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर सेंटर बार असोसिएशन लेबर लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशन अहमदनगर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जागृती या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम प्रसंगी यार्लगड्डा बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव भाग्यश्री पाटील, औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. सोनवणे, न्यायाधीश एस. जी. देशपांडे, न्यायाधीश अभिजीत देशमुख,लेबर लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दीपक चंगेंडे, स्नेहालयचे संचालक गिरीष कुलकर्णी, एल अॅण्ड टी चे संचालक अरविंद पारगावकर, कामगार विभागाचे उपसंचालक, स्वप्नील देशमुख, कामगार विभागाचे उपायुक्त नितीन कवले. सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष के एम देशमुख, अहमदनगर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप वाडेकर हे उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यार्लगड्डा म्हणाले, लोक आता ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणाकडे वळाल्यामुळे शेती क्षेत्रातील बालकामगार समस्या कमी झाली. 16 ते 18 वयोगटात गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. समाजात गरीबी आणि शिक्षणाच्या अभावामुळे बालकामगार प्रथा पहावयास मिळते, असे त्यांनी सांगितले. लेबर लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. चंगेंडे यांनी बाल कामगार कायदे या विषयावर मार्गदर्शन केले.देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढील काळात सर्व लोकांना रोजगार देऊ शकलो नाही तर समाजातील गरिबी वाढत राहील, असा इशारा एल अॅण्ड टी कंपनीचे संचालक अरविंद पारगावकर यांनी दिला. स्नेहालय संस्थेचे संचालक गिरीष कुलकर्णी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.