जामखेड : पुढारी वृत्तसेवा : श्री संत भगवान बाबा यांचे गुरू संत श्री गितेबाबा आणि संत सीताराम बाबा यांच्या खर्डा (ता. जामखेड) येथील समाधीस्थळाला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून राज्य शासनाने 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यानंतर आता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 9 कोटी रुपयांचा भरघोस निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल मानले जात आहे.
संत गितेबाबा, संत सीतारामबाबा यांच्या समाधीस्थळी संत भगवान बाबा यांना मानणार्या भक्तांसह इतरही भक्तगण मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. संत गितेबाबा यांच्या समाधीस्थळी संत भगवान बाबांंची पालखी विसाव्यासाठी थांबत असते. भाविकांना विविध सुविधा मिळाव्यात आणि त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार रोहित पवार यांनी या दोन्ही महान संतांच्या तीर्थक्षेत्राला 6 जानेवारी 2022 रोजी 'ब' वर्ग दर्जा मिळवून दिला. शिवाय आता या दोन्ही स्थळांसाठी त्यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 9 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणला आहे. त्यापैकी 6 कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत.
या निधीतून सभामंडप, महंत निवासस्थान, प्रसादालाय, स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही. आमदार रोहित पवार व सामान्य जनतेच्या सहकार्यातून गिते बाबा यांच्या मंदिराच्या विकासाचे काम सुरू आहे. त्यालाही यामुळे गती मिळेल. शिवाय वाढत्या पर्यटनातून स्थानिकांनाही रोजगार निर्माण होण्यासही मदत होईल.
संत भगवानबाबा, संत गितेबाबा आणि संत सीताराम बाबा यांच्या भक्तांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करू देऊन त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळतेय, हे माझे भाग्य आहे. या परिसराच्या विकासासाठी पुढील काळात जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.