नगर: पुढारी वृत्तसेवा: सोन्याच्या दागिन्याचे दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून दोघांनी महानगरपालिकेच्या सफाई कामगार महिलेची फसवणूक केली आहे. महिलेकडील अडीच तोळ्यांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. पैशाऐवजी महिलेला रुमालात बांधून दगड दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संगीता रमेश चवालिया (55, रा. मंगलगेट, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूकिचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी त्यांच्या नातीसह बाजारपेठेत गेल्या होत्या.
डाळमंडई येथे त्यांना दोन युवक भेटले. त्यांनी त्यांच्याकडील बॅगमध्ये दोन लाख रुपये फिर्यादी यांना दाखविले. त्यातील एक जण म्हणाला,'तुमच्या जवळ किती सोने आहे ते मला काढून द्या, मी तुम्हाला त्याचे दुप्पट भावाने पैसे देतो', असे म्हटल्याने संगीता यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. यानंतर संगीता यांनी त्यांच्याकडील दीड तोळ्याचे मिनी गंठण व एक तोळ्याचे कानातील वेल, झुमके काढून दिले.
चोरट्यांकडे अडीच तोळ्याचे दागिने दिल्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्या हातात गाठोडे बांधलेला रुमाल दिला. सदरचा रुमाल घरी जाऊन सोडण्याचा सल्लाही दिला. फिर्यादी यांनी रुमाल घरी आल्यावर सोडून पाहिला असता त्यामध्ये दगडे मिळून आली. यानंतर कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा