अहमदनगर

झाडांचा सांभाळ, मनपाची तारांबळ

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या अखत्यारित असणार्‍या पिंपळगाव तलाव क्षेत्रात सुमारे दोन हजार झाडे आहेत. त्यातील 126 झाडांची कत्तल झाली. स्थायी समितीत त्यावरून रणकंद झाले, तरीही तेथील दोन हजार झाडांची सुरक्षा रामभरोसे आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातून पूर्वी नगर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत होता.

पिंपळगाव तलावातील सुमारे 700 एकर क्षेत्र मनपाच्या ताब्यात आहे. पिंपळगाव तलाव व उर्वरित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्यात विविध जातीची लहान-मोठी दोन हजार झाडे आहेत. अनेक वेळा या झाडांची कत्तल होते. मनपा जुजबी कारवाई करून मोकळी होते. मात्र, वृक्षतोडीवर ठोस काही कारवाई होत नसल्याने परिसरातील लोक राजरोसपणे वृक्षतोड करतात.

अनेक वेळा वृक्षतोडीचा प्रश्न निर्माण झाल्याने मनपा ते त्या क्षेत्राची मोजणी केली होती. पण तिथे खाब रोवून अथवा कंपाउंड करून हद्द ठरवून घेतली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी मनपाच्या क्षेत्रात घुसतात. त्यामुळे मनपा अधिकारी व शेतकरी असा वाद होतो. पिंपळगाव माळवी येथील झाडांची कत्तल झाल्याच्या आरोपावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात काही शेतकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गुरूवारी (दि. 26) रोजी झालेल्या स्थायी समितीमध्ये नगसेवकांनी पिंपळगाव माळवी तलाव क्षेत्रातील झाडांच्या कत्तलीचा विषय काढला. त्यावरून चांगले रणकंदन झाले. पिंपळगाव माळवी तलाव क्षेत्र परिसराची हद्द निश्चित करून तारेचे कंपाउंड करा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. आत तीच मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

'उद्यान'मध्ये कर्मचार्‍यांची वानवा

महापालिकेच्या उद्यान विभागाकडे अवघे 35 कर्मचारी आहेत. नगरपालिका असताना 180 कर्मचारी होते. त्यातील चार कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत, तर उद्यान विभागातील 52 उद्यानांची देखभाल आहे. त्यातील गंगा उद्यान, सिद्धिबाग, महालक्ष्मी उद्यान देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडे देण्यात आले आहे.

मनपाचे अधिकारी आठवड्यातून काही वेळा पिंपळगाव माळवी परिसराला भेट देतील, तसेच निर्बिजीकरण केंद्रावरीलही कर्मचार्‍यांना लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. शेतकर्‍यांना काही समजल्यास तत्काळ मनपाशी संपर्क करावा.
– शंकर गोरे
आयुक्त, मनपा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT