नगर : पुढारी वृत्तसेवा
शहराच्या बाजारपेठांमधीलहटविण्यासाठी उपोषण केले, आयुक्तांनी लेखी आश्वासन दिले, त्यानंतरही अतिक्रमण जैसे थे. अतिक्रमणांनी त्रासलेल्या नगरच्या व्यापार्यांनी थेट नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची भेट घेत अतिक्रमण हटविण्याची गळ घातली. मंत्री तनपुरे यांनी जिल्हा प्रशासन व महापालिकेची संयुक्त बैठक घेत प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
बाजारपेठेतील अतिक्रमणांबाबत व्यापारी महासंघाने मंत्री तनपुरे यांना निवेदन दिले. मंत्री तनपुरे यांनी तेथूनच महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतरच व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. त्यामुळे आता नगरचे अतिक्रमण निघणार अशी आशा पल्लवीत झाली आहे.
आयुक्तांनी लेखी आश्वासन देऊनही अतिक्रमणाचा प्रश्न सुटलेला नसल्याकडे शिष्टमंडळाने मंत्री तनपुरे यांचे लक्ष वेधले. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक नगरमध्ये घेवून बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी व्यापार्यांना सहकार्य करू असे आश्वासन मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिले.
ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुहास मुळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा, कुणाल भंडारी, ओमप्रकाश बायड, सागर पेठकर, अभिमन्यू जाधव, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी किथानी, प्रतीक बोगावत, सौरभ भांडेकर, ऋषी येवलेकर, संतोष ठाकूर, विजय आहेर, कुणाल नारंग, अमित नवलनी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.