वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पिपलकोटीहून बद्रीनाथकडे देवदर्शनासाठी जाताना पावसामुळे जोशीमठ जवळ रस्त्यावर दरड कोसळल्याने पुढील मार्ग बंद होऊन वाहने अडकून पडली. याच मार्गावरून देवदर्शनासाठी प्रवास करत असलेले नगर तालुक्यातील वाळकी परिसरातील भाविक अडकले. वाळकीच्या तरुणांनी आपल्या 35 सहकारी मित्रांसह रस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे तीन तास मदतकार्य करत रस्ता मोकळा करण्यात आला.
नगर तालुक्यातील वाळकी, भिंगार, बाबुर्डी घुमट, नारायणडोहो, व्हिआरडी येथील तरुण सध्या बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार देवदर्शन यात्रेवर गेले आहेत. पिपलकोटी येथे रात्रीचा मुक्काम करून ते बद्रीनाथकडे दर्शनासाठी जाताना पावसामुळे जोशीमठा जवळ रस्त्यावरच आज (दि. 8) सकाळी दरड कोसळल्याने पुढील मार्ग बंद झाला होता. देवदर्शनासाठी प्रवास करणारे अनेक वाहने अडकून पडले. नगर तालुक्यातील तरुणांनी रस्त्यावर पडलेले दरड हटविण्यासाठी पुढाकार घेतला. रस्त्यावरील मोठे दगड हटवत असताना तासाभराने सार्वजनिक बांधकाम विभागाची त्यांना मदत मिळाली. सुमारे तीन तासानंतर रस्त्यावर पडलेली दरड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.
मदतकार्यात वाळकी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रितम म्हस्के, सेवा संस्थेचे संचालक अमृत काटकर, संदीप गुलाबराव बोठे यांच्यासह व्हीआरडीतील 30 तरुणांच्या टीमने रस्त्यावरील दरड हटविण्यासाठी मदत केल्याने तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी त्यांचे आभार मानत कौतुक केले.
हेही वाचा