अहमदनगर

भाजपचा उमेदवार कोण? निरीक्षकांचा अहवाल प्रदेशकडे

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे यांनी गुरुवारी नगरमध्ये संघटनेतील पदाधिकार्‍यांशी उमेदवारीबाबत 'वन टू वन' चर्चा करून मते जाणून घेतली. त्यानंतर तयार झालेला अहवाल प्रदेश कार्यालयाकडे देण्यात आला असून तेथून तो केंद्रीय कार्यालयाकडे जाणार असल्याचे समजते.
अहमदनगर लोकसभेकरीता भाजपने नगर लोकसभेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार देवायनी फरांदे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.

दुसर्‍याच दिवशी हे दोन्ही निरीक्षक नगरमध्ये आले. लोकसभेसाठी उमेदवार कोण? यादृष्टीने निरीक्षकांनी पदाधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, सचिन पारखी यांच्यासह माजी आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व नगर शहर मंडलाध्यक्ष असे सुमारे शंभर ते 120 पदाधिकार्‍यांशी 'वन टू वन' चर्चा करण्यात आली. प्रत्येक पदाधिकार्‍यांना वन टू वन बोलावून घेण्यात आले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोणला उमेदवारी दिली पाहिजे, याविषयावर मत जाणून घेतले. मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे. कोणत्या तालुक्यात कोणाचे प्राबल्य आहे. भाजपने केलेल्या विकासकामांना जनतेचा कसा प्रतिसाद आहे. उमेदवारीसाठी कोण इच्छुक आहेत. त्यांचा मतदार संघात जनसंपर्क कसा आहे. कोणाला उमेदवारी दिल्यास काय होऊ शकते. असे प्रश्न विचारून पदाधिकार्‍यांची मत जाणून घेतले. त्यासाठी प्रचंड गोपनीयता पाळली. कोणत्या पदाधिकार्‍याने कोणाचे नाव सांगितले, याचा थांगपत्ता कोणालाही लागू दिलेला नाही. दोन्ही निरीक्षक अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा अहवाल प्रदेश भाजप कार्यालयात पोहोच करणार आहेत. तर, त्यांच्याकडून तो अहवाल उद्या भाजपच्या केंद्रीय कार्यालयात दिला जाईल, अशी माहिती समजते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT