‘राजहंस’द्वारे प्रथमच आरटीपीसीआर टेस्ट : वेळेसह वाचणार खर्च | पुढारी

‘राजहंस’द्वारे प्रथमच आरटीपीसीआर टेस्ट : वेळेसह वाचणार खर्च

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : जनावरांना ताप येणे, दुभत्या गाईंना कासामधील संसर्गाने (मस्टीटीस) संसर्ग होतो. यातून पशु धनाच्या आजारांवर शेतकर्‍यांचा मोठा खर्च होतो. यावर उपाय शोधून राजहंस दूध संघाच्या प्रयोगशाळेत राज्यात प्रथमच सर्व संसर्ग रोगांवर जलद व अचूक निदान करणारी आरटीपीसीआर टेस्ट कार्यान्वित केली आहे, अशी माहिती राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी दिली. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघात नवीन संशोधनाबाबत माहिती देताना ते बोलत होत. समवेत पशुमस्य विज्ञान विद्यापीठाचे माजी संचालक, डिन डॉ. अब्दुल समद, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक विक्रम थोरात, क्वेचर लॅबचे संदीप काळे, पशुधन विभाग प्रमुख डॉ विजय कवडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या राजहंस प्रयोगशाळेत क्वेचर लॅबच्या सहकार्याने नवी प्रणाली विकसित केली आहे. जनावरांना विविध परजीवी संसर्गामुळे ताप येतो. आजारी जनावरांना प्रथम अँटिबायोटिक, बुटानीक्स औषधी दिली जातात. यामध्ये वेळ जातो, खर्च वाढतो. कधी जनावर दगावण्याचा धोका असतो. तसेच कासेतील आजारामुळे सडांमधून रक्त, दुर्गंधी येते. हे टाळून तत्काळ उपचार करण्यासाठी बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेजचे मा. डीन डॉ. समथ अब्दुल यांनी दोन्ही आजारांवर अचूक व कमी वेळेत निदान करणारी नवी आरटीपीसीआर कार्यप्रणाली राजहंस प्रयोगशाळेत विकसित केली. या प्रणालीत तापाचा प्रादुर्भाव वाढवणारे रक्तातील परजीवी थेलेरियासीस, बेबीसीओसीस, नाप्लाज्मोसीस व ट्रिपॅनोसोमियासीसची लक्षणे शोधून त्यावर तत्काळ उपचार केले जाणार आहेत.
साधारणतः गाईंना ताप आल्यानंतर 5 हजार रुपयांपर्यंत खर्च होतो, मात्र राजहंस दूध संघाकडून अवघ्या 700 रुपयांमध्ये ही तपासणी होणार आहे.

संगमनेर पॅटर्न राज्याला अनुकरणीय..!

याबाबत डॉ. समथ अब्दुल म्हणाले, शेतकर्‍यांसाठी राज्यात हा पहिला प्रयोग होत आहे. अत्यंत सोप्या- साध्या पद्धतीने व कमी वेळेत शेतकर्‍यांना जनावरांचा आजार, ताप किंवा कासेतील आजारावर उपाय करता येणार आहेत. संगमनेरचा हा पॅटर्न राज्याला अनुकरणीय ठरेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अवघ्या 700 रुपयात तपासणी!

जनावरांना ताप आल्यानंतर तपासणीसह औषधोपचाराचा खर्च येतो, मात्र या नवीन संशोधनामुळे अवघ्या 700 रुपयात तपासणी होईल. 1200 ते 1500 रुपयात हा आजार बरा होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांचा खर्च, वेळ व पशुधन वाचणार आहे. नव्या आरटीपीसीआर संशोधनातून मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा

Back to top button