अहमदनगर

शेवगाव : इथेनॉल प्रकल्पाचा काय फायदा? शेतकर्‍यांचा सवाल

अमृता चौगुले

शेवगाव(अहमदनगर) : ज्ञानेश्वर कारखान्याने शेतकर्‍यांची सुमारे 17 कोटी रुपये ठेव घेतली आहे. इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणासाठी म्हणून कपात केलेल्या या ठेवी शेतकर्‍यांच्या मागणीनुसार परत करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे काही शेतकरी ठेवी परत घेत आहेत, तर काही शेतकरी अडचणीत सापडले आहेत. घेतलेल्या ठेवीतून इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण होणार; मात्र त्याचा शेतकर्‍यांना काय फायदा, असा सवाल होत आहे.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2021 -22मध्ये गळीपास आलेल्या उसातून 109 रुपये 64 पैसे प्रति टन कपात केलेली रक्कम परतीच्या ठेवीत घेतली. ही कपात अनाधिकृत असल्याचे आरोप होऊन, ती मिळण्यासाठी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप जिल्हा सचिव अंकुश काळे यांनी चळवळ सुरू केली. आक्टोबर महिन्यात जनशक्ती मंचचे अ‍ॅड. शिवाजी काकडे यांनी भातकुडगाव फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले होते. तर, काही शेतकर्‍यांनी शहरटाकळी येथे हनुमान मंदिरात उपोषण केले. तदनंतर काही शेतकर्‍यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे तक्रारी अर्ज केला.

यात सहसंचालकाने कारखाना व शेतकरी, असे दोघांचे जबाब घेतल्यानंतर सभासदांनी मागणी केलेल्या ठेवीच्या रकमा त्यांना व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. तर, सुनावणी दरम्यान कारखाना संचालक मंडळाने सभेत शेतकर्‍यांनी समक्ष मागणी अर्ज दाखल करावा, कारखान्याने पुरविलेल्या सेवेसंबंधी येणे रक्कम असल्यास ती वसूल करून उर्वरीत ठेव रक्कम मागणीदार शेतकर्‍यांना आर्थिक उपलब्धतेनुसार त्यांच्या बँक खात्यात परत करण्यात यावी, असा ठराव घेतला होता. काही ऊस उत्पादक शेतकरी आपल्या ठेवी परत घेत आहेत. मात्र, अनेक शेतकर्‍यांना इच्छा असूनही दबावापोटी ठेवी परत मागण्यास मोठी अडचण येत आहे. ज्यांची ठेव कारखान्याकडे राहणार आहे त्यांना त्यावर दीपावली सणाला व्याज दिले जाणार आहे, तर पाच वर्षांनी ही ठेव परत मिळणार आहे.

शेतकर्‍यांचे 17 कोटी कपात

2021 -22मध्ये 16 लाख 60 हजार 540 टन उसाचे गाळप करण्यात आले. यातून गेटकीन उसाच्या ठेवी घेतल्या नसल्याने 109 रुपये 64 पैसे प्रति टनाप्रमाणे शेतकर्‍यांचे सुमारे 17 कोटी रुपये ठेव कपात केल्याचा अंदाज आहे.

शेतकर्‍यांना ठेव रक्कम मोठा आधार

सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. त्यास आर्थिक आडचण निर्मान झालेली आहे. त्यात चलनाचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे ठेव रक्कम मोठा आधार होणार आहे. इथेनॉल प्रकल्प आधुनिकीकरण व विस्तारीकरण होणार ही कारखान्यासाठी जमेची बाजू आहे; मात्र याचा शेतकर्‍यांना काय फायदा, असा सवाल उठत असून, ज्ञानेश्वर कारखाना काही उपपदार्थाची निर्मिती करत आहे. त्याचा अद्याप शेतकर्‍यांना फायदा झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ठेवीबाबत फेरविचार करावा, त्या विनाअट परत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT