अहमदनगर : वाहनांच्या काळ्या काचा; 115 वाहनांवर कारवाई | पुढारी

अहमदनगर : वाहनांच्या काळ्या काचा; 115 वाहनांवर कारवाई

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : वाहनांच्या काचांना काळ्या रंगाच्या फिल्म्स लावून काचा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या वाहन चालकांवर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. वाहनांना काळ्या काचा लावणार्‍या 115 जणांवर कारवाई करण्यात आली असून, 95,500 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच, विना नंबर वाहन, फॅन्सी नंबर प्लेट्सही पोलिसांच्या रडारावर असून पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहने तपासली जात आहेत.

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणार्‍या बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवण्यासोबतच वाहनांवर काळ्या काचा लावणार्‍यांवर कोतवाली पोलीसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. नियमांचा भंग करत वाहनांना काळ्या फिल्म्स लावणारे, फॅन्सी नंबर प्लेटधारकांची संख्या मोठी असल्यामुळे ही कारवाई अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने कोतवाली पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.

वाहनांच्या समोरील व पाठीमागचे काच 70 टक्के आणि बाजूच्या काचा किमान 50 टक्के पारदर्शक असाव्यात असा केंद्रीय मोटर वाहन अधिनियमात नियम 100 नुसार बंधनकारक आहे. काचांवर कोणत्याही प्रकारच्या काळ्या फिल्म्स अथवा इतर पदार्थ लावू नये. लावल्यास पोलिसांनी अथवा संबंधित अंमलबजावणी अधिकार्‍यांनी त्या काढून टाकाव्यात, असे शासनाचे 20 ऑक्टोबर 2012 चे आदेश आहेत.

वाहन चालकांविरोधात कोतवाली पोलिस गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने कारवाई करत आहेत. 1 मार्च ते 24 जुलै पावतो 115 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, 95,500 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दंड आकारला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस कर्मचारी श्रीकांत खताडे, रामदास थोरात, गुलाब शेख, मुकुंद दुधाळ, शिवाजी मोरे, राजेंद्र अमोल गाडे, सुजय हिवाळे, अभय कदम, अतुल काजळे, सोमनाथ राऊत व इतर यांच्या पथकाने केली. वाहनांना काळ्या काचा लावणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.

Back to top button