अहमदनगर

राहुरी : आ. तनपुरेंमुळे रस्त्याचे उजळणार भाग्य

अमृता चौगुले

राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : नगर- मनमाड रस्त्याला जोडणार्‍या मुळा धरण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. आ. प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी शासन काळात पाठपुरावा करीत संबंधित रस्त्यांना सुमारे 6 कोटी रूपयांचा निधी मिळवून दिला होता. सत्ता बदलानंतर सत्ताधार्‍यांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे रस्त्याचे काम होत नसल्याचे आ. तनपुरे यांनी विधानभवनात लक्षवेधी सूचना मांडताच रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण केल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. आ. तनपुरे यांनी महाविकास आघाडी शासन काळामध्ये सहा खात्याचे राज्यमंत्री पद भुषविताना राहुरी परिसरातील अनेक विकास कामांना प्राधान्य दिले होते.

अनेक वर्षांपासून मुळा धरणाला जोडणार्‍या नगर मनमाड रस्ता ते मुळा धरण या रस्त्याची चाळण झाली असतानाच त्यासाठी आ. तनपुरे यांनी तत्कालिन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. नगर- मनमाड ते मुळा धरण रस्त्यासाठी 407.63 लक्ष रूपये तर मुळा धरण घाट माथा रस्ता दुरूस्तीसाठी 167.37 रूपये असे सुमारे 6 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. 31 मार्च 2023 ते 18 एप्रिल 2023 या कालावधित निविदा स्विकारल्या गेल्या. शासकी नियमान्वये संबंधित निविदा 18 एप्रिल रोजी उघडल्या जाणार होत्या. 90 दिवसात निविदा उघडत कार्यारंभ होणे गरजेचे असताना 98 दिवस उलटत असतानाही कार्यारंभ होत नव्हता.

याबाबत आ. तनपुरे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी भूमिका मांडत याबाबत प्रश्न उपस्थित केले. राजकीय नेते मर्जीतील ठेकेदार निवडण्यासाठी प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुळा पाटबंधारे विभागातील अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता या स्तरावरील दिरंगाई झाली. संबंधितांवर राजकीय दबाव असल्यानेच कार्यारंभ आदेश रखडल्याचे आ. तनपुरे यांनी सूचना मांडली.

आ. तनपुरे यांनी विधानसभेत भूमिका मांडल्याचे समजताच पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले. उशिराने का होईना आ. तनपुरे यांच्या भूमिकेच्या धाकाने पाटबंधारे विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केल्याने लवकरच रस्ता कामास कार्यारंभ होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मर्जीतील ठेकेदारांना काम मिळवून देण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव निर्माण केला जात असल्याचे उघड झाले आहे. कामे मंजूर होऊनही मर्जीतील ठेकेदारांना काम मिळवून देण्यासाठी निविदा प्रक्रिया रखडविल्या जातात. यामध्ये सर्वसामान्यांचे अतोनात हाल होतात. बांधकाम व पाटबंधारे विभागामध्ये दबाव पद्धतीचा सर्वाधिक वापर होत असल्याची चर्चा आहे.

मुळा धरण लगतच्या ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास
मुळा धरणाकडे येणारे प्रवाशांसह त्या रस्त्यावरून बाभूळगाव, मुळानगर व वरवंडी ग्रामस्थांना दैनंदिन ये -जा करावी लागते. रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे पडूनही रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. आ. तनपुरे यांनी पाठपुरावा केल्यानंतर रस्त्याला निधी मंजूर झाला. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे काम सुरू होत नव्हते. आ. तनपुरे यांच्या लक्षवेधी सूचनेने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT