अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : अनिल ठवाळ हे सतत विकास कामांच्या तक्रारी करतात. त्यांनी आढळगाव येथील योजनेचीही खोटी तक्रार केली आहे. पुराव्याशिवाय या तक्रारीची दखल घेवू नये, तसेच अशाप्रकारे खोट्या तक्रारी करणार्या ठवाळ यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी आढळगावचे सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले.
दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम असल्याचे दिसले. आढळगाव येथील अनेक ग्रामस्थांनी सोमवारी सकाळपासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दाराजवळ उपोषण सुरू केले. यात सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्यासह काही ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे काही पदाधिकारी, ग्रामस्थांचा समावेश होता.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांचे लक्ष वेधताना ठवाळ हे खोट्या तक्रारी करून अधिकारी, कर्मचार्यांच्या चौकश्या लावतात. अशा खोट्या तक्रारी, उपोषणांमुळे अधिकारी वर्ग काम करण्यास तयार होत नाही. सततच्या तक्रारींमुळे अनेक विकासकामे ठप्प होतात. अनेक सरकारी योजनेची कामे रखडली जातात. खोट्या तक्रारी करणे, यातून स्वहित साधणे हा त्यांचा व्यवसाय आहे. सन 1990 ते 2023 पर्यंत त्यांचे हजारो तक्रारी अर्ज आपल्या कार्यालयात आलेले आहेत. खोट्या तक्रारी करणार्या ठवाळ यांच्या तक्रारीची पुराव्याशिवाय दखल घेतली जाऊ नये व तक्रारीस प्रतिबंध घालण्यात यावा, तसेच ठवाळ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही उपोषणावेळी ग्रामस्थांनी केल्याचे दिसले.
या तक्रारीवर आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे, शरद जमदाडे, नवनाथ वाकडे, मनोहर शिंदे, रघुनाथ शिंदे, मधुकर गिरीमकर, हनुमंत डोके, नितीन गव्हाणे, दादासाहेब गव्हाणे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. दरम्यान, कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून तुमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवू, अशी ग्वाही दिली. मात्र तरीही ग्रामस्थ उपोषण सोडण्याच्या तयारीत नव्हते. प्रशासनाने खोट्या तक्रारदारांवर ठोस कारवाईचे आश्वासन द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यामुळे उशीरापर्यंत हे उपोषण सुरूच होते, असे समजते.
जलजीवन योजनेच्या कामांचे आकडे मोठे आहेत. त्यामुळे साहजिकच तक्रारी वाढत्या आहेत. गेल्या महिन्यात तर उत्तरेतील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याने ठेकेदाराकडून प्रत्येक कामातून पाच टक्के मागणी केल्याची मोठी चर्चा सुरू आहे. एका ठेकेदारानेच ही खळबळजनक माहिती दिली आहे. मात्र कामाच्या गुणवत्तेसाठी सीईओंनी दम भरला असल्याचे सांगून ठेकेदारांनीच हा डाव उधळून लावल्याचे सांगितले जाते.
गेल्या आठवड्यातच अनिल ठवाळ यांनी आढळगावच्या जलजीवन योजनेच्या कामावरून जिल्हा परिषदेत उपोषण केले होते. त्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र आढळगावच्या योजनेवरून आंदोलन करणार्या ठवाळांविरोधातच काल स्थानिक सरपंचांनी ग्रामस्थांसमवेत उपोषणरुपी आंदोलन करून ठवाळांची तक्रार खोटी असल्याचे सांगितले. त्यामुळे आता सीईओ अशा खोट्या तक्रारींबाबत काही धोरण ठरविणार का, याकडे लक्ष आहे.
आढळगाव योजनेची अनिल ठवाळ यांनी खोटी तक्रार केली होती. त्यामुळे आज आम्ही उपोषण केले. यापुर्वीही श्रीगोंदा पंचायत समितीसमोर आम्ही उपोषण केले आहे. सीईओंनी याबाबत गंभीर दखल घेवून खोट्या तक्रारी करणार्या ठवाळ यांच्यावर कारवाई करावी.
– शिवप्रसाद उबाळे,
सरपंच, आढळगाव
हेही वाचा