अहमदनगर

Nagar News : सीमोल्लंघनासाठी सज्ज नगरकर; विजयादशमीचा सर्वत्र उत्साह

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : नऊ दिवस नऊ रंगांची उधळण, नऊ फुलांच्या माळा, सकाळ संध्याकाळ पूजा आणि रात्री रास-दांडियाचा आनंदोत्सव साजरा झाल्यानंतर मंगळवारी विजयादशमीचे (दसरा) सोने लुटण्यासाठी आणि सीमोल्लंघनासाठी नगरकर सज्ज झाले आहेत. नवरात्रोत्सवाच्या आनंदाचा परमोच्च बिंदू म्हणून दसरा साजरा करताना पारंपरिक उत्साह ओसंडून वाहत आहे. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी झेंडू, शेवंतीसह विविध फुलांच्या राशी ग्राहकांसाठी मांडून ठेवण्यात आल्या आहेत. झेंडूच्या फुले सोमवारी 30 ते 60 रुपये किलो दराने विकली जात होती.

दरम्यान, विजयादशमीच्या मुहूर्तावर दुचाकी-चारचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी कित्येक नागरिकांनी शोरूममध्ये नोंदणी करून ठेवल्याचे विविध शोरूमच्या चालकांनी सांगितले. तसेच टीव्ही, मोबाईल आणि विविध गृहोपयोगी वस्तूंची खरेदीही दसर्‍याच्या मुहूर्तावर होत असल्याने शहर व उपनगरांमध्ये या वस्तूंची दुकानेही सजली आहेत.

अनेक वस्तूंवर विविध प्रकारच्या ऑफरही दुकानदारांनी जाहीर केल्या असून, त्यांच्या जाहिराती करण्यात आल्या आहेत. शहरात अनेक कुटुंबांनी खरेदी केलेल्या नव्या घरांमध्ये गृहप्रवेशाचेही नियोजन केले आहे. त्यातून सीमोल्लंघनही करण्यात येणार आहे. दसर्‍यानिमित्त सायंकाळी शहरात ठिकठिकाणी रावणदहनाच्या कार्यक्रमांचेही नियोजन करण्यात आल्याचे समजते.

विजयादशमीच्या आख्यायिका

विजयादशमीच्या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती, त्यांचे विजयादशमीला पूजन करून पुन्हा घेतली. त्यामुळे शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. म्हणूनच विजयादशमीला या वृक्षाची पाने लुटली जातात. त्यालाच आपण सोने लुटणे म्हणतो. त्याला आपटाही म्हणतात.

रामायणात याच दिवशी प्रभू राम रावणाचा वध करतात. या दिवसाची आठवण म्हणून, सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर, तसेच नीतीचा अनितीवर विजय म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा होतो. आणि या दिवशी रावणाचा पुतळा जाळला जातो.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT