जामखेड : पुढारी वृत्तसेवा : आरक्षणासाठी मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने अठ्ठावन्न मोर्चे काढले. 48 मराठा समाजबांधवांनी बलिदान दिले. जालना येथील मनोज जरांगे 13 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. मात्र, राज्य सरकार व सर्वच राजकीय नेतेमंडळी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी चालढकल करीत आहेत. मराठा समाजाचा अंत पाहू नका. मराठा समाज पेटला तर महाराष्ट्रात उद्रेक होईल, असा इशारा जामखेड सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी जामखेड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने खर्डा चौकात रविवारी सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की, राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणा करीत आहे. आरक्षणाऐवजी आमदार कसे फोडायचे, याचा अभ्यास करीत आहे. 370 कलम हटविता, एका दिवसात सरकार स्थापन करता, मग आरक्षणासाठी एवढी वर्षे का? असा सवाल करण्यात आला.
कर्जत-जामखेडच्या दोन्ही आमदारांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. महाराष्ट्र सरकार जे ठरवेल ते एका रात्रीत होते. मात्र, मराठा आरक्षणच का मिळत नाही? कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागत आहोत. मराठ्यांना आरक्षण दिले नाही, तर मतदानावर बहिष्कार टाकून मराठ्यांची ताकद दाखवून देऊ, असा इशारा देण्यात आला.
आंदोलना दरम्यान ज्ञानेश्वरी भोगिल हिने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी जाकीर शेख यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा दिला. नय्यूम शेख यांनी प्रहार संघटना, तर पत्रकार यासीन शेख, जामखेड तालुका वकील संघटनेने आंदोलनाला पाठिंबा दिला.
हे ही वाचा :