कोपरगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात संवत्सर येथे गोदावरी नदी पात्रात पौराणिक कथेनुसार नारदामुनींच्या 60 पुत्रांच्या समाध्या आहेत, परंतु आज त्यांचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. कोपरगाव रेल्वे स्थानकावरून संवत्सरकडे जाण्यास रस्ता आहे. काही अंतरावर छोट्या पुलाखालून संवत्सरनजीक गोदापात्रात नारदी नदीचा प्रवाह आहे. येथे नारदमुनींच्या पुत्रांच्या 60 समाध्या काटेरी बाभळींच्या वेढ्यात नामशेष होण्याच्या बिकट अवस्थेत पाहून जागरुक नागरिकांचे हृदय पिळवटते.
महाराष्ट्राच्या जनतेसह शासनाला हे माहित व्हावे. दुर्लक्षित पौराणिक नारदमुनींच्या 60 पुत्रांच्या समाध्यांना राजमान्यता मिळावी, अशी अपेक्षा कोपरगावचे भाविक करीत आहेत. तालुक्यात पौराणिक, ऐतिहासिक वारसा अस्तित्व जपणारी पुरातन मंदिरे व धार्मिक स्थळे आहेत, परंतु ती दयनीय व शरपंजरी अवस्थेत आहेत. त्यांचे अवशेष शासन दरबारी न्याय मागत आहेत. या उपेक्षित धार्मिक स्थळांकडे लक्ष देण्यासह त्यांचा इतिहास जिवंत ठेवण्याची मागणी होत आहे. काही दिवसांत हा अनमोल इतिहास नामशेष होईल, ही वस्तुस्थिती मनास बोचते. पावन व पुण्यभूमी आहे. रामायण व महाभारत ग्रंथात येथील धार्मिक स्थळांचा उल्लेख सापडतो. तालुक्यात पौराणिक व ऐतिहासिक घटनांचा संदर्भीय पुरावा प्रचलित कथा व स्मारकांच्या रूपाने दिसतो.
दक्षिण गंगा गोदावरीच्या अमृत सिंचनाने व प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसरात प्राचीन काळी ऋषीमुनी, तपस्वी महापुरुष, साधू-संत, महात्मे यांनी गोदावरीच्या तटी यज्ञ, याग, तपश्चर्या व ध्यानधारणा केली. हा परिसर 'दंडकारण्य' म्हणून प्रसिद्ध आहे. नारदाचे नारदीत रूपांतर होवून नारदीला 60 पुत्र झाले. म्हणून 'साठ संवत्सरे' नावाने येथील एक मनोरंजक कथा आहे. द्वापारयुगात नारद व भगवान श्रीकृष्ण यांची ती अख्यायिका आहे.
नारदमुनींचे नारदीत रूपांतर झालेल्या स्त्रीला एक कोळी इसम घरी घेऊन गेला. तिच्याशी लग्न केले. पुढे नारदीला 60 मुले झाली. (तिच 60 संवत्सरे होती). नारदी अगदी त्रासून गेली. तिने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्ण आले. नारदाची अवस्था पाहून त्यांना हसू आले. संसारपाशातून नारदाची सुटका करण्याचे त्यांनी ठरविले. 'नारदी' झालेल्या नारदास पुन्हा संगमावर जाऊन 'नारीहर' असे म्हणत पाण्यात बुडी मारण्यास सांगितले. तसे करताच नारदास नरदेह प्राप्त झाला. हा क्षण म्हणजे 'कपिला षष्ठी'चा दिवस होता.
अशारीतीने नारदमुनींचे प्रायश्चित्त पूर्ण झाले. ते पुन्हा नामसंकीर्तनात रमले. नाम घेत त्रैलोक्याच्या भ्रमणास निघून गेले, मात्र नारदाची 60 मुले येथेचं राहू लागली. त्यांची वस्ती निर्माण झाली. ती वस्ती म्हणजे 'संवत्सर' होय. आजही संवत्सर येथे त्या 60 नारदी पुत्रांच्या समाध्या अस्तित्वात आहेत, परंतु कालौघात व पुरातत्व विभागाच्या व दुर्लक्षामुळे त्यांचे भग्नावशेष शृंग ऋषीच्या मंदिरामागे गोदा किनारी काटवनात पहावयास मिळतात.
पौराणिक, ऐतिहासिक वास्तू टिकवून ठेवणे, वेळोवेळी डागडुजी करणे, वास्तूमध्ये आकर्षकता निर्माण करणे, त्या-त्या पौराणिक, ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व स्पष्ट करणारे माहिती फलक लावणे, माहिती पत्रकाद्वारे संबंधित वास्तूंची माहिती जनतेला देणे आदी कार्य पुरातत्त्व खात्याकडे आहे. संवत्सरसह कोपरगाव परिसरात अनेक ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ व दाखले आहेत. असे असताना यासर्व बाबींचा येथे अभाव असल्याचे स्पष्ट जाणवते.
कोपरगाव तालुक्यात ही आहेत पौराणिक स्थळे..!
महानुभाव पंथाचे श्रीचक्रधर स्वामींचे स्थान, श्रीकृष्णाचे मंदिर, नारद पुत्रांच्या 60 समाध्या, शृंगऋषींचे मंदिर, सीता माईला कुंकू लावले ते कुंकुमस्थान, भगवान विष्णूंचे हेमाडपंथी कलाकुसरीचे मंदिर, महान संत रामदासी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, शिर्डीचे श्रीसाईबाबांची तपोभूमी, दक्षिण काशी अर्थात पुणतांबेचे महा तपस्वी योगिराज चांगदेव महाराजांची समाधी, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, धामोरीची गोरक्षनाथांची चिंच, प्रभु श्रीरामचंद्रांनी पिता राजा दशरथांचा तर्पण विधी केलेले डाऊच, चासनळी गावी मायावी मारीच हरणाने उंच- उंच उड्या मारीत केलेले पलायन, त्याला मारलेला बाण, दैत्यगुरु शुक्राचार्य, संजीवनी मंत्राची भूमी, जुनी गंगा अशी कोपरगाव बेट भागात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे आहेत.
हे ही वाचा :