अहमदनगर

वीजप्रश्नाकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई करा : आमदार मोनिका राजळे

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  वीजप्रश्न महावितरण कर्मचार्‍यांना गांभीर्य नाही. ते लोकांचे फोन घेत नाहीत. वीजप्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल कारवाई करण्याचा, तसेच महावितरण कार्यालयात ठाण मांडण्याचा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी दिला.
पाथर्डी तालुका आमसभा व टंचाई आढावा बैठकीत आमदार राजळे बोलत होत्या. या वेळी प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसीलदार श्याम वाडकर, उपविभागीय कृषी अधिकारी पोपट नवले, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे, कृषी अधिकारी सुधीर शिंदे, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, माणिक खेडकर, चारुदत्त वाघ, अजय भंडारी, सुभाष बर्डे, विष्णूपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, काका शिंदे, बंडू पठाडे, मुख्याधिकारी संतोष लांडगे, विकास शिंदे, संजय बडे, नितीन गर्जे उपस्थित होते. जलजीवन मिशन आणि महावितरणाविरोधात बैठकीत तक्रारींचा पाढा लोकांनी वाचला.

संबंधित बातम्या : 

तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी कर्मचार्‍यांनी गावांत जाऊन लोकांचे प्रश्न जाणून त्यांचे निराकरण करावे. लोकांना कर्मचार्‍यांनी समाधानकारक उत्तरे द्यावीत. नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर तुम्ही काय कार्यवाही केली, याचा अहवाल येत्या आठ दिवसांत द्या, असा आदेश आमदार राजळे यांनी दिला.

तालुक्यातील 34 गावांत जलजीवन योजनेची कामे चालू आहेत. या सर्वच कामांविषयी नागरिकांनी मोठ्या तक्रारी केल्याने या विषयावर, तसेच वांबोरी चारी टप्पा तीन या विषयावर स्वतंत्ररित्या बैठक घेण्याचे आश्वासन राजळे यांनी दिले. राजळे म्हणाल्या, सध्या तालुक्यात तेरा टँकर सुरू असले, तरीही आगामी काळात आणखी संख्या वाढणार असल्याने अधिकार्‍यांनी या विषयावर तातडीने उपाययोजना कराव्यात. टँकरची आवश्यकता असलेल्या गावांसाठी तातडीने प्रस्ताव पाठवावेत. जायकवाडी जलाशयाजवळ जिल्हा नियोजनच्या निधीतून नवीन वीजपंप घ्या, माणिकदौंडी परिसरातील गावांसाठी पाणीयोजना मंजूर करून आणू. ई पीक पाहणीत सर्वच खातेदारांचा कसा समावेश होईल, ते पाहावे. बैठकीत संजय बडे, संजय मरकड, बाळासाहेब अकोलकर, अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ, अजय भंडारी, पोपट बडे, नागनाथ गर्जे, बाळासाहेब पाखरे आदींनी भाग घेतला.

'त्या' वायरमनला लगेच निलंबित करा
साकेगाव येथील पूर्वीच्या वायरमनने शेतकर्‍यांचे वीजबिलाचे लाखो रुपये हडप केले. लोकांशी उद्धटपणे वागून महावितरणची वायर, तारा भंगारात विकण्याचा प्रताप केला, अशा कर्मचार्‍याला निलंबित करा, अशा सूचना आमदार राजळे यांनी दिल्या.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT