अहमदनगर

फळबागांचे अनुदान जमा होणार; गतवर्षी केळी बागांचे अतिवृष्टीने नुकसान

Laxman Dhenge

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी नुकसान झालेल्या फळबागांचे अनुदान लवकरच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यात बहुतांशी केळी बागांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचा समावेश आहे. मागील वर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील बाधित पिकांना शासनाने 136 कोटी 61 लाख 6 हजार रुपये अनुदान दिले आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यास 12 लाख 9 हजार 380 रुपये मदत उपलब्ध झाली आहे. वादळी पावसाने, केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले होते. वादळाने केळीची सर्व झाडे मोडून पडली.

परिणामी शेतकरी उत्पन्नाला मुकला आणि झालेला पूर्ण खर्च वाया गेला. त्यामुळे या शेतकर्‍यांनी शासनाकडे अनुदानाची मागणी केली होती. तालुक्यात खुंटेफळ, दादेगाव, बोडखे, कर्जत खु, भाविनिमगाव, दहिगावने, रांजणी, घेवरी, दहिफळ, ढोरहिंगणी, एरंडगाव, लाखेफळ, विजयपूर, कर्‍हेटाकळी, मडके, रावतळे या 16 गावांतील 138 शेतकर्‍यांच्या 54 हेक्टर फळबागांच्या नुकसानीचे अनुदान लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी शेतकर्‍यांनी केवायसी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय खात्यावर अनुदान जमा होणार नाही. सदर पिकास हेक्टरी 17 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. केळी लागवड व त्याच्या संगोपनास येणारा खर्च पाहता शासनाने दिलेले हेक्टरी 17 हजार रुपये अनुदान म्हणजे, तोंडाला पाने पुसल्यागत आहे. आलेल्या अनुदानात केळी रोपांचा खर्चही वसूल होत नसल्याची चर्चा शेतकर्‍यांत चालू आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT