सोनई(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील विकासकामांना राजकीय द्वेषातून खोडा घातला जात असून, पाटपाणी आवर्तन काळात लाभक्षेत्रात तब्बल 20 दिवस वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. तोे कदापि सहन केला जाणार नाही. त्यात बदल न झाल्यास सरकार व प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशारा माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांनी दिला.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घोडेगांव येथे सुरु असलेल्या पाणी योजनेच्या ठेकेदारावर अन्यायकारक दंडात्मक कारवाई करत काम बंद पाडण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप करत घोडेगांव ग्रामस्थांनी शनिवारी उत्स्फुर्तपणे गाव बंद ठेवत आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखालीनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चौफुलीवर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. आमदार गडाख म्हणाले, 48 कोटी 49 लाख रुपयांच्या घोडेगाव पाणी योजनेसह तालुक्यात 410 कोटी रुपयांच्या 55 पाणीयोजनांना अथक परिश्रमातून मंजूरी मिळविली.
राज्यात सत्ता बदलानंतर तालुक्यातील मंजूर विकास कामे रखडविण्याचे तसेच त्यांना खोडा घालण्याचे गलिच्छ राजकारण सुरु झाल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय द्वेषातून पाणी योजनांना आडकाठी आणणे दुर्दैवी असून त्याची सुरुवातच घोडेगांवमधून झाल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
घोडेगाव साठवण तलावाच्या खोदकामा दरम्यान निघणारा मुरुम एक किलोमीटरच्या परिघातील शेतकरी, ग्रामस्थांच्या रस्त्यांवर टाकला जाण्याला मंजूरी मिळालेली असताना ठेकेदारास अडीच कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईची नोटीस बजावतात, हे घाणेरडे राजकारण लोकांच्या लक्षात आल्याचे आमदार गडाख यांनी यावेळी नमूद केले. जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी फोन उचलत नसल्याची गंभीर बाब आ. गडाखांनी निदर्शनास आणून दिली.
हेही वाचा