अहमदनगर

अहमदनगर : सहा लाखांचा रेशनिंगचा गहू पकडला

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : काळ्या बाजारात विक्रीसाठी चालविलेला शासकीय रेशनिंगचा सुमारे 6 लाख 25 हजार रूपये किमतीचा गहू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरमध्ये पकडला. हा गहू नेण्यासाठी वापरण्यात आलेला 40 लाख रूपये किमतीचा मालट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. मध्यप्रदेश येथून पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील संकेश्वर फुड प्रॉडक्ट प्रा. लि. कंपनीकडे एक ट्रक नगरमार्गे जात असून, त्यातून शासकीय रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विक्रीस नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली.

त्यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर मुकुंदनगरकडे जाणार्‍या रस्त्याजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरजवळ सापळा लावला. संशयित ट्रक तेथे आल्यानंतर पोलिसांनी तो थांबवून पाहणी केल्यावर त्यात गव्हाने भरलेली पोती दिसली. ट्रक चालकाला विचारणा केली असता त्याने हा शासकीय गहू प्रमोद साहु (रा. खणीयादाणा, ता. जि. शिवपुरी, मध्यप्रदेश) यांच्या मालकीचा असून, तो विक्रीसाठी सुपा एमआयडीसीतील संकेश्वर फुड प्रॉडक्ट प्रा. लि. कंपनीत घेऊन चालल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी ट्रकमधील अनिल ताराचंद बगेल (वय 21, राकोरगार, ता.जि. शिवपुरी, मध्यप्रदेश), अनोज नारायणसिंग बगेल (वय 21, रा बोराणा, ता बेराड, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश) या दोघांसह 6 लाख 25 हजारांचा गहू व 40 लाखांचा ट्रक ताब्यात घेतले. सहायक फौजदार राजेंद्र वाघ यांच्या यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT