अहमदनगर

नगर : सीना नदीवर सहा बंधारे मंजूर

अमृता चौगुले

मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या सीना नदीवरती आता 6 बंधारे बांधण्यासाठी राज्य सरकारची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना याचा मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करुन सीना नदीवरील 10 पैकी 6 बंधार्‍यांना मंजूरी मिळवली आहे. तसेच उर्वरित 4 बंधारे म्हणजेच निमगाव गांगर्डा, निमगाव डाकू, दिघी व चौंडी यांचे देखील गेट दुरुस्ती काम प्रस्तावित असून त्याला देखील लवकरच मंजुरी मिळेल, अशी आशा उंचावली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोहित पवार यांनी राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन सर्वेसाठी परवानगी मिळवली होती. सर्वे पूर्ण झाल्यानंतर आता 10 पैकी 6 बंधार्‍यांना मंजूरी मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून आमदार रोहित पवार यांनी उर्वरीत 4 बंधार्‍यांनाही मंजूरी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून पाणी गळती थांबवता येईल. सीना लाभक्षेत्रात असलेले रातंजन, घुमरी, नागलवाडी, नागापूर, सितपुर, तरडगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांचे रुपांतर लातूर टाईप बॅरेजमध्ये होणार असून याचा सीना लाभरक्षेत्रातील शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

मार्च-एप्रिलच्या दरम्यान कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतकर्‍यांना पाणी कमी पडत असे. परंतु, आता लातूर टाईप बॅरेज बंधारे होत असल्याने शेतकर्‍यांना याचा मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे. या शिवाय 2880 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राला याचा कायमस्वरूपी फायदा होणार आहे. आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत देखील यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. जुन्या पद्धतीचे कोल्हापूर पद्धतीचे बॅरेज बंधार्‍यांनी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लातूर टाईप बंधारे बांधण्यात यावेत, अशी विनंती केली होती. या विनंतीनुसार सरकारने देखील लगेच संपूर्ण महाराष्ट्रात लातूर टाईप बॅरेज करावेत, असे निर्देश दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण बंधार्‍यांच्या सर्वेसाठी परवानगी मिळवली होती. तो सर्वे पूर्ण झाल्यानंतर ते बंधारे व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी अनेकवेळा पाठपुरावा केला होता. तसेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर 10 पैकी 6 बंधार्‍यांना परवानगी मिळाली आहे. उर्वरित चार बंधार्‍यांनाही परवानगी मिळावी, यासाठी मी पाठपुरावा करत आहे.
                                                                                       – आमदार रोहित पवार 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT