नगर : गणेशभक्तांना यंदा महागाईचा चटका | पुढारी

नगर : गणेशभक्तांना यंदा महागाईचा चटका

श्रीकांत राऊत

नगर : लाडक्या गणरायाचे आगमन अर्थात गणेशोत्सव सव्वा महिन्यावर येऊन ठेपल्याने शहरातील विविध कारखान्यांमध्ये बाप्पांच्या मूर्तींवर रंगांचा अखेरचा हात फिरविण्याचे काम जोमात सुरू आहे. मूर्तीचे डोळे, दागिन्यांची रंगरंगोटी सध्या वेगात सुरू असून, त्यासाठी कामगार रोज बारा ते पंधरा तास काम करत आहेत. कारखान्यांत 50 टक्के मूर्तींचे बुकिंग झाले असून, 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत बाजारात मूर्ती विक्रीसाठी दाखल होतील. दरम्यान, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

नगर शहरात गणेशमूर्ती बनवणारे लहान-मोठे शंभर कारखाने असून, हजारो गणेशमूर्ती त्यात साकारल्या गेल्या आहेत. सात इंचांपासून तर 10 फुटांपर्यंत उंचीच्या मूर्ती तयार झाल्या असून, या वर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत 30 टक्के वाढ झाली आहे. नगरच्या गणेशमूर्तींना देशांतर्गत बाजारात मोठी मागणी असते. गुजरात, मध्य प्रदेश, हैदराबाद (तेलंगणा) आणि महाराष्ट्राच्या विविध भागात नगरमधून गणेशमूर्ती पाठविल्या जातात.

या वर्षी मूर्ती बनविण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असून, त्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीही तीस टक्क्यांनी वाढणार आहेत. दुसरीकडे गणेशमूर्तीच्या उंचीवरील निर्बंध सरकारने उठविल्याने सार्वजनिक मंडळांच्या वतीने मोठमोठ्या गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. गणेशभक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून, नगर-कल्याण रस्त्यावरील गणेशमूर्तींच्या कारखान्यांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तींची बुकिंग सुरू झाली आहे.

Back to top button