अळकुटी : पुढारी वृत्तसेवा : कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. खा.शरद पवार यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना प्रत्येक गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, या हेतूने निस्वार्थीपणे कार्य करत कर्मवीरांनी घालून दिलेला 'रयत'चा वारसा जपण्याचे काम केले, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. अळकुटी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री साईनाथ हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी आ.लंके बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबाजी भंडारी होते. याप्रसंगी विजयकुमार आहेर, महावीर पोखरणा, महेश शिरोळे, सरपंच कोमल भंडारी, उपसरपंच अरिफ पटेल, बाळासाहेब पुंडे, प्राचार्य मंगेश जाधव, कुंदन साखला, जितेश सरडे, रेनवडीचे सरपंच श्रीकांत डेरे, शिरापूरचे सरपंच हनुमंत भोसले, आप्पासाहेब ठुबे, संतोष काटे, सुदाम म्हस्के, बाळकृष्ण परंडवाल, नूरमोहंमद कुरेशी, शशिकांत कनिंगध्वज, रामदास नरड, बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब पोखरणा, संजय मते, अविनाश परंडवाल, शिवाजी म्हस्के, बाळासाहेब गुजर व ग्रामस्थ उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
साईनाथ विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी संतोष कवडे व रामदास कवडे यांनी 51 हजार, भास्कर उचाळे व अंकुश उचाळे यांनी 51 हजार, सुनील देशमुख यांनी 25 हजार रूपयांची देणगी दिली. या दात्यांसह विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा आमदार लंके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
एमपीएससी अभ्यासिका लवकरच
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचेकडे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अळकुटी व टाकळी ढोकेश्वर येथील अभ्यासिकांचा प्रस्ताव दाखल केला आहे. लवकरच त्यास मंजुरी मिळून अभ्यासिकेचे काम चालू होईल. अळकुटी व परिसरातील 20 ते 22 गावांतील विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा फायदा होईल, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
रोटरीकडून मुलींसाठी स्वच्छतागृह
शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहाच्या मागणीला प्रतिसाद देत रोटरी क्लब ऑफ आळेफाटाचे अध्यक्ष विजयकुमार आहेर व संस्थापक महावीर पोखरणा यांनी विद्यालयातील मुलींसाठी 27 लाखांचे स्वच्छतागृह बांधून देण्याचे जाहीर केले.