अहमदनगर

अहमदनगर : ‘दुकानदारी’त अडला शालेय गणवेश !

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळेतील मुलांना पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचे आदेश शासनाने दिले खरे, मात्र स्थानिक स्कूल कमिटीला 'बैठकी'साठी वेळ न मिळाल्याने अजूनही बहुतांश शाळांमध्ये जुन्याच गणवेशात मुले धडे गिरवत आहेत. दरम्यान 'दुकानदारी' हेही त्यामागील एक कारण असल्याची कुजबुज सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्वच शाळांकडून गणवेश वाटपाची माहिती मागविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनुसुचित जातीचे 16597, जमातीचे 19207, दारिद्रयरेषेखालील 10635 तसेच सर्व मुली 1 लाख 13 हजार 259, अशा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना शालेय गणवेश खरेदी शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जुनला वितरीत करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या आहेत. मात्र अजूनही गणवेश वाटप झालेले नाही.

विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी 4 कोटी 87 लाखांची रक्कम त्या-त्या शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांच्या संयुक्त बँक खाती वर्ग झालेली आहे. गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापनला आहेत. मात्र अनेक ठिकाणी व्यवस्थापनच्या बैठकीपूर्वीच मुख्याध्यापकांनी परस्पर खरेदी केल्याचे समजते. तर काही ठिकाणी सचिव या नात्याने मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापनच्या अद्यापही बैठकाच बोलाविल्या नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गणवेश खरेदीचा विषय अधांतरिच आहे.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची निराशा!

शाळांतील मुला-मुलींना पहिल्याच दिवशी गणवेश देण्याच्या सूचना करूनही बहुतांशी शाळांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी सोडाच पण आठवडा उलटल्यानंतरही नवीन गणवेश विद्यार्थ्यांना मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

गणवेश फाटला तर जबाबदारी निश्चिती

गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापनला आहेत. त्यामुळे गणवेशाचे कापड हे आयएसआय/बीआयएस दर्जाचे असावे. गणवेश लवकरच फाटला, विरला किंवा दर्जाहिन असल्याचे स्पष्ट झाल्यास त्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापन समितीवर असणार असल्याचेही शासनाने कळविले.

15 जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. किती शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश दिले, त्याची संख्यात्मक माहिती आपल्या स्वाक्षरीनिशी 22 जूनपर्यंत पाठवावी. गणवेश दिला नसल्यास त्याची कारणे कळवावीत, अशा सूचना गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT