खरवंडी कासार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : खरवंडी येथील दुर्धर आजाराने त्रस्त व 95 टक्के अपंगत्वाने बाधित असलेल्या कल्पना आत्माराम अंदुरे (वय 45) यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानासाठी दोन वेळा अर्ज दाखल केला. मात्र, समितीच्या अधिकार्याकडून सदर अर्ज गहाळ झाल्याने, ही महिला अनुदानापासून वंचित आहे.
साडेतीन वर्षांपासून अनुदानाअभावी या महिलेची फरफट सुरू आहे. साडेतीन वर्षांपासून या महिलेच्या पतीने पंधरा ते वीस वेळा कार्यालयात हेलपाटे मारले. आमदार मोनिका राजळे यांच्या स्विय सहाय्यकांनी तहसीलदार श्याम वाडकर यांना लक्ष घालण्याची विनंती केली. वाडकर यांनी संबधितांना सूचना केल्या. मात्र, अंदुरे यांचा अनुदानाचा प्रस्ताव काही सापडला नाही.
कल्पना अंदुरे यांना दुर्धर आजार असून, त्यांचा औषधोपचाराचा खर्च दोन ते अडीच हजार रुपये आहे. सरपंच प्रदीप अंदुरे यांनी कल्पना अंदुरे यांचे पती आत्माराम अंदुरे यांना संजय गांधी निराधार योजनेचा प्रस्ताव दाखल करण्याचे सांगितले. त्यांनी 11 डिसेंबर 2019 रोजी संजय गांधी समितीला सेतू कार्यालयामार्फत प्रस्ताव दाखल केला. अंदुरे यांनी अनुदानाबाबत कार्यालयात चौकशी केली असता, प्रस्तावच आला नसल्याचे सांगितले गेले.
नव्याने प्रस्ताव दाखल करण्यास सांगण्यात आले. गरज असल्याने त्यांनी कागदपत्रे जमवून, पुन्हा 13 सप्टेंबर 2022 रोजी सेतू कार्यालयात प्रस्ताव दाखल केला. सेतू कार्यालयाने 15 सप्टेंबर 2022 ला संजय गांधी समिती कार्यालयाकडे हा प्रस्ताव पाठविला. आता या कार्यालयात पुन्हा प्रस्ताव सापडत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. आता पुन्हा नव्याने प्रस्ताव दाखल करा, असे सांगितल्याने अंदुरे हे हतबल झाले आहेत.
हेही वाचा