कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : महसूल पथकातील तलाठ्यास काठीने जबर मारहाण करून वाळू तस्करांनी जप्त केलेले वाहन पळवून नेले. तालुक्यातील जेऊरकुंभारी येथे गुरूवारी (दि.9) पहाटे 6 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. राजू शेखसह अन्य 4 तस्करांचा यामध्ये समावेश आहे. वाळू तस्करांनी तालुक्यात पुन्हा थैमान घातल्याने तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी त्याची गंभीर दखल घेतली. देर्डे फाटा येथे गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून, चोरटी वाहतूक होत असल्याची खबर त्यांना मिळाली. त्यानंतर गुरूवारी पहाटे 4 वाजता महसूल पथक घटनास्थळी धडकले. तेथे त्यांना वाळू भरलेला विना क्रमांकाचा डंपर आढळला. पथकाने चालकाकडे परवान्याची विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर वाळूचे वाहन तलाठी प्रवीण डहाके व इंगळे यांनी जप्त केले.
हे वाहन तहसील कार्यालयाकडे नेत असताना सकाळी 6 च्या सुमारास जेऊरकुंभारी येथे एचपी पेट्रोल पंपानजिक राजू शेखसह अन्य 4 साथीदारांनी संगनमताने डंपर जप्त करण्यास अडथळा केला. शेख याने तलाठी डहाके यांना डंपरमधून हात धरून खाली ओढत धक्काबुक्की केली. 'तू आमच्यावर कारवाई केल्यास तुला अँटीकरप्शनमध्ये घालवील, अशी धमकी दिली. अन्य अनोळखी आरोपींनी डहाके यांच्या हातातील मोबाईल हिस्कावून घेतला. डहाके यांनी विरोध केला असता, शेख याने काठीने उजव्या हात-पायावर मारून दुखापत केली. धाक दाखवून डहाके यांच्या ताब्यातील डंपर बळजबरीने पळवून नेला.
याप्रकरणी तलाठी डहाके यांनी कोपरगाव शहर पोलिसांत राजू शेखसह अनोळखी चालक व अन्य इसमांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह उपनिरीक्षक भरत दाते पुढील तपास करीत आहेत.
हल्ले खपवून घेणार नाही : तहसीलदार
सध्या गोदापात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. महसूल यंत्रणा सतर्क केली आहे. महसूल कर्मचार्यांवर होणारे हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाही. यापेक्षा आणखी कठोर कारवाई करू, असे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी सांगितले.
हेही वाचा :