रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर, श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेचा सर्व्हे सुरू झाला आहे. यामाध्यमातून भीमा नदी खोर्यातील पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, याअंतर्गत ही योजना मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
नगर, श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांना पाणी देण्यासाठी 30 वर्षांपासून मागे पडलेली ही योजना खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी वारंवार पाठपुरावा करून सर्व्हेसाठी निधी मंजूर करून आणला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या योजनेत लक्ष घालून तत्काळ सर्व्हे करण्याचे आदेश दिले. यानुसार या योजनेची कार्यवाही सुरू करण्यात आली.
साकळाई उपसा जलसिंचन योजना नगर जिल्ह्यातील एक महत्वाची पाणी योजना असून, नगर दक्षिणेतील गावांना पाणी देण्यासाठी या योजनेची मागणी 1990मध्ये पुढे आली; परंतु बदलणारी ध्येयधोरणे आणि निधीच्या कमतरते मुळे ही योजना मागे पडली. आता, खासदार डॉ. सुजय विखे यांनी संसदेत या योजनेची माहिती देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली.
त्यानुसार योजना आता सर्व्हे होऊन लवकर मार्गी लागणार आहे. सर्व्हे करण्यासाठी जलसंपदा व पाटबंधारे विभागातील अधिकारी देशमुख, बानके, तसेच त्यांचे सर्व सहकारी योजनेचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, सुरेश काटे, संतोष लगड, सोमनाथ धाडगे, नारायण रोडे, योगेंद्र खाकाळ, रोहिदास उदमले, विलास रणसिंग, लाभार्थी गावातील शेतकरी उपस्थित होते.
सह्याद्री पर्वत रांगेच्या साकळाई डोंगर रांगेतून हे पाणी जिरायती भागाला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा नदी खोर्यात येणार्या धरणातील अतिरिक्त पाणी नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी खूप प्रयत्न केले. 35 गावांना हे पाणी मिळण्यासाठी शेतकर्यांनी ही वेळोवेळी आंदोलने करून सरकारला धारेवर धरले होते.
साकळाई योजना मार्गी लागल्यानंतर नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांची शेती उन्हाळ्यातही फुलणार आहे. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावून शेतकर्यांची आर्थिक सुबत्ता वाढण्यास नक्कीच मदत होईल. अनेक वर्षांपासून दुष्काळी भागाला पाणी देण्याचे स्वप्न साकार होणार असल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा