अहमदनगर

नगर : जवळ्यात कांदा प्रश्नावर रस्तारोको

अमृता चौगुले

जवळा : पुढारी वृत्तसेवा :  केंद्र सरकारने कांद्यावर भरमसाठ निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.22) पारनेर तालुक्यातील शिरूर-जवळा-निघोज या राष्ट्रीय महमार्गावर जवळा बसस्थानकाजवळ अडीच तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी पारनेर बाजार समितीचे संचालक डॉ. आबासाहेब खोडदे यांनी सरकारच्या जुलमी धोरणाचा निषेध केला. केंद्रातील भाजपचे सरकार हे नेहमी शेतकरीविरोधी निर्णय घेते. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत शेतकरी भाजप सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कधी नव्हे ते शेतकर्‍याच्या टोमॅटोला चांगला भाव मिळाला, तर लगेच टोमॅटोची आयात केली.

कांदावर 40 टक्के निर्यात शुल्क लादले. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा बाजार समिती संचालक किसनराव रासकर, संदीप सालके यांनीही निषेध केला. निघोजचे मंडलाधिकरी भाऊसाहेब मापारी यांनी निवेदन स्वीकारून शेतकर्‍यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविल्या जातील, असे सांगितले. आंदोलनात सरपंच मोहन आढाव, सुभाष आढाव, जयसिंग सालके, किसनराव रासकर, सुभाष खोसे, संदीप पाटील, प्रदीप सोमवंशी, गोरख आढाव, सुभाष खोसे, संतोष सालके, कानिफ पठारे, गोरख सालके, कैलास डोमे, किरण कारखिले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रवासी, विद्यार्थी ताटकळले
सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेले आंदोलन अकरा वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले. बंदोबस्तासाठी असणारे पोलिस व आंदोलकांनी एसटी बससाठीही जागा मोकळी करून न दिल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT