अहमदनगर

काष्टी : गाळप क्षमता दोन हजार टनांनी वाढविणार

अमृता चौगुले

काष्टी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची सात हजार टन ऊस गाळप क्षमता आहे. ही क्षमता आणखी दोन हजार टनाने वाढवून नऊ हजार टन केल्यानंतर आपण खासगी साखर कारखान्याप्रमाणे सभासदांना भाव देऊ. कारखाना नफ्यात आणण्याची जबाबदारी मी व्यक्तिगत खांद्यावर घेतो. अन्यथा राजकारण करणार नाही, असा निर्धार कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केला.

कारखान्याची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 30) झाली. त्या वेळी नागवडे म्हणाले, की सभासदांच्या ठेवीचे रूपांतर शेअर्समध्ये केले आहे. विरोधी सभासदांनी कारखान्यावर सातशे कोटी रुपये कर्ज असल्याचा अपप्रचार सुरू केला आहे. जिल्हा बँकेच्या कर्जाचा दर जास्त असल्यामुळे आणि केद्र सरकारच्या योजनेचा 6 टक्के दर असल्यामुळे 260 कोटींची मागणी केली आहे. जिल्हा बँकेचे 205 कोटी कर्ज असून त्यातील 110 कोटी रुपये कर्ज साखरेवर आहे.

ते वजा जाता कारखान्यावर फक्त 90 कोटींचे कर्ज आहे. तेही आम्ही वेळेत फेडत असून विरोधक सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी कर्जाचे आरोप करत आहेत. उसाला अजून चांगला भाव मिळवण्यासाठी सभासदांनी प्रामाणिक राहून चांगला ऊस बाहेरच्या कारखान्यांना न देता आपल्या कारखान्याला द्यावा असे आवाहन नागवडे यांनी केले.

कारखान्याच्या सभेत घोड आवर्तनाचा मुद्दा गाजला. माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, भारत राष्ट्र समितीचे नेते घनश्याम शेलार, अ‍ॅड. विठ्ठलराव काकडे, माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इथापे, भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, भाऊसाहेब मांडे, नितीन पाटील, तुकाराम कोकरे, शहाजी गायकवाड, उत्तमराव नागवडे, हनुमंत झिटे, राजेंद्र भोस, पोपट ठाणगे, किरण नागवडे, मेजर नलवडे यांनी विविध सूचना केल्या.

उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, प्रेमराज भोईटे, लक्ष्मण नलगे, जिजाबापू शिंदे, विलासराव वाबळे, टिळक भोस, अजित जामदार, अरुण पाचपुते, कैलास पाचपुते, तालुक्यातील मान्यवर नेते, सर्व आजी माजी संचालक व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी उपाध्यक्ष सुभाष शिंदे यांनी केले. अहवाल वाचन रमाकांत नाईक यांनी केले. संचालक भाऊसाहेब नेटके यांनी आभार मानले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT