अहमदनगर

युवकांच्या हाताला रोजगार पाहिजे; राशीनमध्ये रास्ता रोको आंदोलन

अमृता चौगुले

राशीन(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदार संघातील वाटेगाव आणि खंडाळा येथे 'एमआयडीसी' मंजूर झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्याम कानगुडे यांच्या नेतृत्वाखाली राशीनमधील महात्मा फुले चौकात सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कर्जत-जामखेडच्या सर्वांगिण विकासासाठी 'एमआयडीसी' आवश्यक आहे. मतदारसंघातील सुशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून 'एमआयडीसी' झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. आमदार रोहित पवारांनी केलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला. यावेळी 'एमआयडीसी' आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश शिंदे, शाहू राजेभोसले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मोढळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, राम कानगुडे, गणेश कदम, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पांडुळे, अशोक जंजिरे, रामचंद्र खराडे, तुषार सूळ, बापू धोंडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आदिनाथ मोढळे, धनंजय जगताप, इमरान शेख, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल शेटे, संजय मोढळे, मनसेचे प्रसाद मैड आदी उपस्थित होते.

रास्ता रोको आंदोलन दीड तास चालले. यामुळे दौंड – धाराशिव रस्ता व कर्जत – बारामती रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राशीनचे मंडल अधिकारी विश्वास राठोड, पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, कामगार तलाठी प्रशांत गोंडचर यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT