पृथ्वीच्या दिशेने येत आहे 52 फुटी लघुग्रह | पुढारी

पृथ्वीच्या दिशेने येत आहे 52 फुटी लघुग्रह

वॉशिंग्टन : ‘नासा’ने म्हटले आहे की पृथ्वीच्या दिशेने 52 फुटांचा आकार असलेला एक लघुग्रह येत आहे. या लघुग्रहाचे नाव ‘2020 पीपी 1’ असे असून तो 48 तासांमध्ये पृथ्वीजवळून जाईल. 2019 पासून 2023 च्या दरम्यानच्या काळात तो आता पाचव्यांदा पृथ्वीच्या दिशेने येत आहे.

या लघुग्रहाचा वेग ताशी 14,400 किलोमीटर इतका आहे. मात्र, त्याचा आकार फार मोठा नसून तो अवघा 52 फुटांचा आहे. यापूर्वी 9 ऑगस्ट 2019, 5 ऑगस्ट 2020, 3 ऑगस्ट 2021 आणि 1 ऑगस्ट 2022 या दिवशी हा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला आहे. ‘नासा’ दरवर्षी या लघुग्रहावर लक्ष ठेवते. यावर्षी तो 29 जुलैला पृथ्वीजवळून जाईल. असे अनेक लघुग्रह वेळोवेळी पृथ्वीजवळून जात असतात.

क्वचित कधी तरी त्यांची पृथ्वीला धडकही होत असते. अशा धडकांमुळे निर्माण झालेली विवरे पृथ्वीवर अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. एका मोठ्या आकाराच्या लघुग्रहाच्या भीषण धडकेनंतर पृथ्वीवरून डायनासोरचे साम्राज्य नष्ट झाले होते. अशा अवकाशीय शिळांचा एक पट्टाच मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे.

Back to top button