अहमदनगर

नेवाशात ‘जनसेवेचा यज्ञ’ चालूच ठेवणार : आमदार शंकरराव गडाख

अमृता चौगुले

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य शिबीर हे काळाची गरज असून, या शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळणारा दिलासा हेच आपले आत्मिक समाधान आहे. विविध माध्यमातून नेवासा शहर व तालुक्यात जनसेवेचा यज्ञ अखंडितपणे चालूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा येथे आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व पुणे येथील इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आमदार गडाख यांच्या हस्ते झाले.

त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, रामभाऊ जगताप, नंदकुमार पाटील, अंकुश महाराज जगताप, संजय सुखदान, रणजित सोनवणे, संदीप बेहेळे, राजेंद्र मापारी, फारूख आतार, इम्रान दारूवाले, आसिफ पठाण, अ‍ॅड.सतीश पालवे, हिरामण धोत्रे, लक्ष्मीनारायण जोंधळे महाराज, नारायण लोखंडे, सरपंच दादा निपुंगे, नीलेश जोशी, सागर देशपांडे, उपप्राचार्य दशरथ आयनर, संजय थोरात, पी. आर. जाधव, सुनील धायजे, प्रकाश सोनटक्के, पिंटू परदेशी, कारभारी परदेशी आदी उपस्थित होते.

आमदार गडाख म्हणाले, डोळा हा मनुष्याचा अत्यंत नाजूक असा अवयव असून, त्यावर उपचार करणे हे अत्यंत खर्चिक व कठीण असते. त्यामुळे सर्वसामान्य वंचितांची सेवा म्हणून या शिबिराच्या माध्यमातून उपचार करण्याचा छोटासा प्रयत्न सर्वांच्या सहकार्यातून करत आहे. समाजातील अनेक वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचे किती छोटे-मोठे प्रश्न असतात हे आपल्या लक्षात येत नसते. तसेच उपचार खर्चिक असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे नेवासा तालुक्यातील वृद्ध, ज्येष्ठ व वंचितांची सेवा म्हणून सर्वांच्या सहकार्याने विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा आपला प्रयत्न राहील. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे अमृत फिरोदिया, 'ज्ञानेश्वर'चे संचालक काकासाहेब शिंदे, बुधराणी हॉस्पिटलच्या डॉ. मनीषा कोरडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक काका गायके यांनी केले.

125 रुग्णांवर होणार शस्रक्रिया

शिबिरात डॉ.मनीषा कोरडे व डॉ.मीरा पटारे यांनी 424 नेत्ररुग्णांच्या तपासण्या केल्या. त्यांना नेवासा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. यापैकी 125 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर बुधराणी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया होणार आहे.

ही उपेक्षितांची सेवा : उद्धव महाराज

'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' समजून समाजातील वंचित, दुर्लक्षित व उपेक्षित घटकांची सेवा मोफत आरोग्य शिबिराचे माध्यमातून आमदार शंकरराव गडाख हे करत आहेत. मोफत आरोग्य शिबिराचा त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT