अहमदनगर

पीएम किसान योजनेचे पैसे लटकले !

अमृता चौगुले

कर्जत / मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा : पीएम किसान योजनेचे पैसे पोस्ट कार्यालयात जमा झाले मात्र, पोस्टाचे उंबरठे झिजवूनही शेतकर्‍यांना त्यांचे पैसे देण्यासाठी कर्मचारी टाळाटाळ करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आमच्याकडे पैसे जमा नाहीत, आमचा आयडी चालत नाही, अशी वेगवेगळी कारणे पोस्टातून दिली जात असल्याने शेतकर्‍यांना जड पावलाने माघारी परतावे लागल्याचे चित्र आहे. पीएम किसान योजनेचे पैसे पोस्टाच्या खात्यावर जमा होत आहेत. मिरजगाव येथील शेतकर्‍यांचेही पोस्ट खात्यात पैसे जमा झाले. मात्र हे कार्यालय गावापासून खूपच अंतरावर आहे. तिथेही दुसर्‍या मजल्यावर हे कार्यालय आहे. वृद्ध शेतकर्‍यांना 16 ते 17 पायर्‍या जिना चढून वरती जावे लागत आहे. तरीही आपले पैसे काढण्यासाठी वृद्ध शेतकरी तसेच दिव्यांग बांधव हे वरती जातात. परंतु तिथे गेल्यानंतर कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीचे उत्तरे देवून माघारी पाठवत आहेत. त्यामुळे पैसे न मिळाल्याने शेतकर्‍यांना निराश हाताने परतावे लागत असल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या :

दरम्यान, पोस्टात गेल्यावर आम्ही नवीन कर्मचारी आहोत, माझा आयडी नसल्यामुळे मला पैसे देता येत नाही, अशा पद्धतीने जाणीवपूर्वक शेतकर्‍यांची अडवणूक होत आहे. तसेच कर्मचारी अतिशय उद्धट पद्धतीने वागणून देत असल्याच्याही तक्रारी आहेत. वास्तविकतः पीएम किसानचे पैसे आलेले शेतकर्‍यांच्या मोबाईलवर मेसेज येतात, परंतु पोस्ट कार्यालयात सात ते आठ हेलपाटे मारल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. त्यामुळे पीएम किसानचे पैसे पोस्ट ऐवजी बँकेत जमा करावे, अशा बहुतांशीच शेतकर्‍यांची मागणी आहे.
काही शेतकर्‍यांनी टोल फ्री क्रमांकावर, तर काहींनी पीएम किसानच्या पोर्टलवर तक्रारीची नोंद केलेली आहे. त्यामुळे मिरजगाव पोस्ट कार्यालय म्हणजे 'असून अडचण अन नसून खोळंबा' अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे मिरजगावच्या पोस्ट कार्यालयातील कर्मचार्‍यांना शेतकर्‍यांशी चांगली वागणूक देण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्‍याने देण्यात यावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT