धुळे तालुक्यात 30 तलाठी, 10 मंडळ कार्यालयांसाठी 6.75 कोटी मंजूर | पुढारी

धुळे तालुक्यात 30 तलाठी, 10 मंडळ कार्यालयांसाठी 6.75 कोटी मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे तालुक्यात 30 तलाठी कार्यालय इमारत आणि 10 मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारत बांधकामांना धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी एकूण 6 कोटी 75 लक्ष रुपये मंजुर करण्यात आले असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले. मंडळ कार्यालय आणि तलाठी कार्यालय इमारतींच्या बांधकामांमुळे धुळे तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची गैरसोय दूर होणार आहे.

धुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही तलाठी व मंडळ कार्यालयांसाठी स्वताच्या मालकीची इमारत नव्हती. आतापर्यंत ही कार्यालये गावातील ग्रामपंचायत, सामाजिक सभागृह, मंदिर किंवा गावातील खाजगी इमारतीत सुरु होती. महसूल विभागाची कामेही आता ऑनलाईन प्रणालीतून होऊ लागली आहेत. स्वताची इमारत नसल्याने ऑनलाईन कामे करतांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परिणामी महसूल कर्मचार्‍यांसोबत शेतकर्‍यांची गैरसोय होते. त्यामुळे सुसज्ज तलाठी कार्यालय आणि मंडळ कार्यालये असावी अशी मागणी धुळे तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांकडून अनेकवेळा केली जात होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करुन आ.कुणाल पाटील यांनी नवीन तलाठी व मंडळ कार्यालय बांधकामासाठी प्रस्ताव तयार करुन सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. सदर प्रस्तावाचा शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून धुळे तालुक्यात 30 तलाठी कार्यालय इमारत आणि 10 मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारत बांधकामांचा नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अर्थ संकल्पीय पुरवणी यादीत समावेश करुन निधी मंजुर करण्यात आला आहे.

तलाठी कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी 75 लक्ष रुपये तर मंडळ कार्यालयासाठी 1 कोटी 80 लक्ष रुपये मंजुर करण्यात आले असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले आहे. धुळे तालुक्यात तलाठी व मंडळ कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आ.कुणाल पाटील यांनी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा :

Back to top button