अहमदनगर

Nagar news : मागील वर्षाची नुकसान भरपाई मिळेना

अमृता चौगुले

भेंडा : पुढारी वृत्तसेवा : ऑक्टोबर 2022 व एप्रिल 2023 मधील अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यास शेतकर्‍यांनी केवायसी करूनही नेवासा तहसीलमधील टंचाई शाखेतून विलंब व दिरंगाई कशामुळे होते, असा प्रश्न अनेक लाभधारकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रथम ही नुकसान भरपाई मिळण्यास 5 कृषी मंडळांमध्ये कमी पाऊस व कमी नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मदत मिळालीच नसल्याने शेतकरी नाराज झाले होते. परंतु, भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रयत्न केल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तालुक्यातील राहिलेल्या पाचही मंडळामध्येही नुकसान भरपाई मंजूर केली.

संबंधित बातम्या : 

त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले असले तरी, केवायसी करून महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही अनेकांना ही नुकसान भरपाई अजून खात्यात जमा झालेली नाही. शेतकरी टंचाई विभागात गेल्यावर तेथील कर्मचारी शेतकर्‍यांशी अरेरावी करणे, व्यवस्थित उत्तरे न देणे, माहिती स्पष्ट न सांगणे, तसेच इतरांकडे पाठविणे, कामाच्या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित नसणे, जेवणाची सुट्टी दोनदोन तास घेणे, आदी प्रकारांमुळे अनेक शेतकरी दररोज हेलपाटे मारत आहेत.

याबाबत आठ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे अनेक शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या. त्यानंतर खासदार लोखंडे यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडेच या कर्मचार्‍यांविषयी तक्रार केली होती. तरीही कामात सुधारणा होत नसल्याने नक्की काय प्रकार आहे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. या कर्मचार्‍यांकडे तालुक्यातील रस्ता केस प्रकरणे असल्याने अनेक शेतकरी दररोज आपले काम होईल, या अपेक्षेने येतात. परंतु, त्यांची निराशा होत असून, कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न त्यांनाही पडला आहे.

मागील वर्षाचे 9 लाख थकित
मागील वर्षात गळनिंब येथील 34 शेतकर्‍यांना कपाशी पिकाच्या नुकसानीची एकूण 9 लाख रूपये भरपाई सुमारे 9 महिन्यानंतरही मिळालेली नाही. त्यासाठी शेतकरी तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारून थकले आहेत.

दुरूस्तीसाठी सेतू चालकाकडे पाठवणी
अतिवृष्टीची नुकसान भरपाई आधारकार्डमधील विविध चुकांमुळे मिळत नाही. ही दुरूस्ती टंचाई शाखेच्या टेबलवरच संबंधित कर्मचार्‍याने करणे आवश्यक आहे. परंतु, हा कर्मचारी एका सेतू चालकाकडे शेतकर्‍यांना पाठवून तोच हे काम करील असे सांगतो. तो सेतू चालक पैसे घेऊन दुरूस्ती करून देतो.

अन्यथा तलाठी कार्यालयासमोर धरणे
मागील वर्षी अतिवृष्टीने झालेली कपाशीची रक्कम अजूनही मिळत नाही. त्याबाबत तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी व्यवस्थित उत्तरे देत नाहीत. आठ दिवसात रक्कम न मिळाल्यास गळनिंब येथील 34 शेतकरी कुटुंबांसह तलाठी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील, असे लाभार्थी पूनम रमेश शेळके, सूर्यभान यादव शेळके यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT