नगर : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेने अमृत अभियानांतर्गत हरित पट्टे विकसित करण्यासाठी शहरात 32 ठिकाणी ओपन स्पेसवर नवीन उद्याने निर्माण करून देखभाल दुरूस्ती ठेकेदारांकडे दिली होती. या उद्यानांतील शेकडो झाडे जळून गेल्याचे वृत्त 'दै. पुढारी'ने प्रकाशित करताच मनपाने त्यासाठी 20 उद्यानांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
तर, अन्य ठेकेदारांनी देखभाल दुरूस्ती सुरू केली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडे मोठ्या प्रमाणात उद्याने आहेत. मात्र, त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी अवघे 30 कर्मचारी कार्यरत आहेत. उपनगरामध्ये होणार्या नवीन वसाहतींमध्ये उद्यान उभे करण्यासाठी मनपाकडे कर्मचारी वर्गच नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे उपनगरांमध्ये होणार्या नवीन वसाहतीतील ओपन स्पेसवर अमृत योजनेंतर्गत उद्याने साकारण्याचा निर्णय महापालिकेने चार वर्षांपूर्वी घेतला होता.
अमृत अभियानांतर्गत बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातील 32 ठिकाणी ओपन स्पेस विकसित करून, त्या जागेवर उद्याने उभारण्याचा मनपाने निर्णय घेतला. रितसर निविदा प्रसिद्ध करून सुमारे 32 ठेकेदारांना विविध ठिकाणचे ओपन स्पेस विकसित करण्यासाठी दिले. ठेकेदारांकडून विविध जातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ती झाडे चांगली रोपली.
दरम्यान, कोरोना काळात या उद्यानांकडे ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात झाडे जळाली. याबाबत 'पुढारी'ने 'नवी बहुतांश उद्याने उजाड' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाने 32 उद्यानांपैकी 20 उद्यानांना नवीन ठेकेदार नेमणुकीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तर, अन्य उद्यानामध्ये संबंधित ठेकेदारांनी देखभाल दुरूस्ती सुरू केली आहे.
झाडांना आळे करणे, मोटार दुरूस्ती करणे आदी कामे सुरू केली आहे. मात्र, केवळ एकाच उद्यानामध्ये नागरिक नासधूस करतात. तिथे गुरे चारतात. मोटार, ठिंबकचे नुकसान करतात, अशा तक्रारी संबंधित ठेकेदाराने केल्या आहेत. आागरकर मळा, आहेर कॉलनी, बोल्हेगाव , नंदनवन कॉलनी, रेणुकानगर, रेणावीकर कॉलनी, श्रीनाथ कॉलनी, कर्डिले निवास, मधुबन कॉलनी, तीर्थंकर कॉलनी, फुलेनगर, कानडे मळा, मातोश्री उद्यान, आयोध्यानगर, भूषणनगर, ताराबाग कॉलनी, साईनगर, चैतन्यनगर, प्रेमभारतीनगर, भाग्योदय कॉलनी, आसरा सोसायटी, आदर्शनगर, अष्टविनायक कॉलनी आदींसह नवीन सात उद्यानांचा त्यात समावेश आहे.
अमृत अभियानातील 20 उद्यानांसंबंधित देखभाल दुरूस्तीची नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर, अन्य उद्यानांमध्ये संबंधित ठेकेदारांनी देखभाल दुरूस्ती सुरू केली आहे.
सुरेश इथापे
शहर अभियंता, महापालिका