नेवासा (अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा एसटी आगाराचा सावळा गोंधळ वाढला आहे. नियोजनात विस्कळितपणा आलेला असून, कोणत्याच बसेस वेळेवर सुटत नाहीत. अधिकार्यांच्या मनमानीमुळे ऐन आषाढी एकादशीच्या धामधूमीत वारकर्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आषाढी एकादशी येत्या 29 तारखेला असल्याने प्रवाशांची वारकर्यांची पंढरपूरला जाण्यासाठी नेवासा एसटी आगारात मोठ्या प्रमाणात चार-पाच दिवसांपासून गर्दी वाढली आहे. परंतु, नेवासा आगारातून पंढरपूरकडे जाणार्या जादा एसटी बसेसचा पत्ताच नाही. नियोजनाचा कोणता मेळ नाही. कंट्रोलरला काहीच सांगता येत नाही.
आषाढी वारी जवळ आल्याने पंढरपूरकडे जाणार्या भाविकांची संख्या वाढत आहे. नगरला सुद्धा पुरेशा बसेस नाहीत. नेवासा आगाराचा कारभार असून नसल्यासारखा झालेला दिसत आहे. जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणार्या बसेसचे प्रमाण मोठे आहे. मात्र, नेवासा आगारातच बसेसची कमतरता कशी का झाली आहे. आगार प्रमुखांचे नियंत्रण नसल्याचे नागरिक सांगतात.
शनिवारी सकाळपासूनच पंढरपूरला जाण्यासाठी बसस्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी ताटकळत उभे होते. दहा वाजता पंढरपूर बस लागेल असे सांगण्यात आले. परंतु, बराच कालावधी झाला तरी बसचा ठावठिकाणा लागला नाही. एखादी रिकामी बस आली की प्रवाशांची धावपळ होत असल्याचे दिसून आले. अशा सावळा गोंधळ कारभारामुळे उत्पन्नात वाढ होण्याऐवजी घटच होणार असल्याचे नागरिक सांगत होते.
कल्याण, मुंबई, पुणे अशा काही महत्त्वाच्या बसेस गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या असल्यानेही नेवासा आगाराला त्याचा आर्थिक फटका बसलेला आहे. केवळ अक्कलकोट बस सुरू केलेली आहे. काही एसटी बसेस बंद केल्याने व आहे त्या बसेस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांना नेवासा फाट्यावरील खासगी बसेसचा आधार घ्यावा लागत आहे. पंढरपूरसाठी जादा बसेस व कारभारात सुधारणा तातडीने करावी. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
हेही वाचा