अहमदनगर

सुपा : पारधी समाजात परिवर्तनाची गरज : डॉ. बी. जी. शेखर

अमृता चौगुले

सुपा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पारधी समाज हा वर्षानुवर्ष शिक्षणापासून वंचित असल्याने, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागे राहिला आहे. शासनाने या समाजाला भरपूर सवलती दिल्या असल्याने, त्यांनी चोरी करण्याचे कारण नाही. गुन्हेगारी सोडून त्यांनी मुख्य समाज प्रवाहात येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी केले. पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात पारधी वस्तीवर किशोर मंत्री चव्हाण यांच्या घरावर पुणे येथील देवराई सेवाभावी संस्थेचे प्रणेते नामदेव भोसले यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.

त्यांचे उद्घाटन डॉ. शेखर, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नामदेव भोसले, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी संपतराव भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, शिरीषकुमार देशमुख, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, संभाजीराव गायकवाड, उपनिरीक्षक तुळशीराम पवार, वाघुंडे खुर्द सरपंच रेश्मा पवार, वाघुंडे बुद्रुक सरपंच संदीप वाघमारे, आदी उपस्थित होते.

शिवराई सेवाभावी संस्थेचे नामदेवराव भोसले यांनी पारधी समाज एक जीवनपट प्रस्तुत केला. त्यांनी राज्यात अकरा जिल्ह्यात 587 कॅमेरे पारधी समाजाच्या घरावर बसविले आहेत. पारधी समाजाची सांकेतिक भाषा पहिल्यांदाच भोसले यांनी पुस्तकातून जगासमोर मांडली आहे. या समाजातील अनिष्ट रूढी भोसले यांनी बर्‍याच जिल्ह्यामध्ये बंद केल्या आहेत.

पारधी समाजातील शेती, शेळीपालन, व्यवसाय, नोकरी करणारे कोपरगावचे रोहन भोसले, बिबीशन चव्हाण, श्रीमंत भोसले,शिरूरचे देविदास भोसले, उरुळी कांचनचे स्वप्निल भोसले यांचा डॉ.शेखर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. लहान मुलांना मिठाई व महिलांना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आभार मानले.

समाजाने अपराधीवृत्ती सोडावी : ओला

किशोर मंत्री चव्हाण यांच्या घरावर चार कॅमेरे लावण्याचा उपक्रम अतिशय चांगला आहे. यामुळे पोलिसांची निश्चित मदत होणार आहे. या समाजाने मेहनत करून आपले जीवन जगावे. अपराधीवृत्ती सोडून समाजातील लोकांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT