नगर : पुढारी वृत्तसेवा : संपदा पतसंस्था घोटाळाप्रकरणी दोषी निश्चित झालेल्या 17 आरोपींना न्यायालयाने शिक्षेबद्दल म्हणणे मांडण्यास संधी दिली. त्यावेळी एक वृद्ध संचालकाने साहेब मला ऐकू येत नाही, असे सांगितले. न्यायालयाने 17 जणांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर सरकारी वकील व आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद झाला. निकालासाठी न्यायालयाने दहा एप्रिल तारीख दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. संपदा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव सबाजी वाफारे, सुजाता ज्ञानदेव वाफारे, संचालक सुधाकर परशुराम थोरात, भाऊसाहेब कुशाबा झावरे, दिनकर बाबाजी ठुबे, राजे हसन अमीर, बबन देवराम झावरे, लहू सयाजी घंगाळे, हरिश्चंद्र सावळेराम लोंढे, शाखा अधिकारी रवींद्र विश्वनाथ शिंदे, शाखा अधिकारी साहेबराव भालेकर, कर्जदार संजय चंपालाल बोरा, अनुप पारेख, सुधाकर सुंबे, महेश बबन झावरे, गोपीनाथ शंकर सुंबे, संगिता हरिश्चंद्र लोंढे अशा 17 आरोपींवर दोष निश्चिती झाली आहे.
जिल्ह्यात संपदा पतसंस्थेच्या सुमारे 13 शाखा होत्या. या शाखांमध्ये 25 कोटी 93 लाख 78 हजार 189 रुपयांच्या ठेवी होत्या. तर 26 कोटी 96 लाख 48 हजार 395 रुपयांचे कर्ज येणे बाकी होते. 31 मार्च 2010 रोजी झालेल्या लेखा परीक्षणानंतर सुमारे 13 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. याबाबत लेखापरिक्षक देवराम मारूतराव बारस्कर यांच्या फिर्यादीवरून संपदा पतसंस्थे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे याच्यासह संचालक व कर्जदार असे 28 जणांविरुद्ध 1 ऑगस्ट 2011 रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा झाला. जिल्ह्यातील बहुचर्चित संपदा पतसंस्थेतील 13 कोटी 38 लाख 55 हजार 667 रुपयांच्या घोटाळाप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने 17 आरोपींना दोषी धरले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांच्यासमोर सुरू होती. सरकार पक्ष व आरोपी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायालयाने विविध कलमान्वये सर्व आरोपींना दोषी धरले असून, आज न्यायालयाने आरोपींना म्हणणे मांडण्याची संधी दिली. मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे यांच्यासह सर्वच आरोपींनी शिक्षेबद्दल म्हणणे मांडले. त्यातील एका वृद्ध आरोपीने साहेब मला ऐकायला येत नाही आता माझे वय 90 आहे, असे सांगून हतबलता व्यक्त केली. दरम्यान, आरोपीतर्फे शिक्षेबद्दल युक्तिवाद करण्यात आला. कायद्यानुसार आरोपींना कमी कमी शिक्षा देण्यात यावी, असे म्हणणे मांडले. सरकार पक्षातर्फे बाजू मांडताना अतिरिक्त सरकारी वकील अनिल ढगे यांनी आरोपींनी गरीब ठेवीदाराचे पैसे हडप केले. त्यात अनेकांचे संसार उघड्यावर आले असून त्यांना जास्ती जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद केला. शिक्षा सुनावण्यासाठी न्यायालयाने 10 एप्रिल तारीख ठेवल्याचे समजते.
हेही वाचा