नगर : पुढारी वृत्तसेवा : शालेय विद्यार्थ्यांना अतिरिक्त आहारातून पोषक घटकतत्व मिळावेत, यासाठी सरकारने अंडी देण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र सहा आठवड्यांचे अग्रीम शाळांना मिळालेच नसल्याने काही शिक्षकांनी खिशात हात घातलाच नाही, तर काही ठिकाणी पैशांची तरतूद झाली पण भागमभाग करूनही अंडीच मिळाली नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशी अंडी मिळेल का हो, अंडी.. अशी साद घालताना शिक्षक पहायला मिळाले. दरम्यान, अंडी न मिळाल्याने अनेक शाळांत पहिल्या दिवशी ना अंडी उकडली, ना बिर्याणी शिजली.
जिल्हा परिषदेच्या 4546 शाळा आहेत. या ठिकाणी पहिली ते आठवीचे 4 लाख 57 हजार 192 विद्यार्थी आहेत. त्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी, केळीवाटपाचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची सुरुवात दिवाळी सुटीनंतर शाळा उघडल्यावर पहिल्या बुधवारी किंवा शुक्रवारपासून करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेतून सर्व गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक यांच्या माध्यमातून शाळांना शुक्रवार 24 रोजी अंडी देण्याबाबतच्या तशा सूचना पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते.
मात्र काल शुक्रवारी अनेक शाळांना या सूचनाच प्राप्त झालेल्या नसल्याचे सांगण्यात आले. तसेच काही शाळांत शासनाचे पैसे मिळालेले नसल्याने शिक्षकांनीही धाडस दाखविले नाही, त्या ठिकाणी तेथील पोषण आहार शिजविणार्यांनाच अंडी आणण्याचा भुर्दंड दिला, काही शाळांत धावपळ करूनही पाच रुपये दराने अंडी मिळालीच नाहीत. काही शाळांमध्ये 1 डिसेंबरपासून आम्हाला अंडी देण्याचे कळविले असल्याचे सांगितले गेले, त्यामुळे पोषण आहाराचा पहिल्या आठवड्यात बट्याबोळ उडाल्याचे पहायला मिळाले.
शाळांनी अंडी दिली असतील तर त्याचे फोटो शिक्षण विभागाने मागाविले होते. काल शुक्रवारी काही शाळांनी तसे फोटो शिक्षण विभागाच्या सोशल ग्रुपवर पाठवून दिले. मात्र अनेक शाळांनी आपले फोटो दिलेच नाहीत. त्यामुळे अशा किती शाळांनी पोषण आहार दिला नाही, याबाबत शिक्षण विभाग आढावा घेत असल्याचे पोषण आहार विभागातून सूरज थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा