अहमदनगर

Nagar News : मुळा धरणातून आज पाणी सोडणार!

Laxman Dhenge

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्याच्या हालचाली अंतिम टप्यात आल्या आहेत. मांजरी, मानोरी व वांजूळपोई या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या फळ्या काढून घेण्यात आल्या आहेत. डिग्रस बंधार्‍याच्या फळ्या काढण्यात आल्या असून आज रविवारी(दि.२६) रोजी दुपारी १२ वाजता जायकवाडीतून पाणी झेपावरणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाने दिली आहे.

मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता यांसह जायकवाडी धरणाचे उपअभियंता यांसह दोन शाखाभियंता अधिकारी मुळा धरण स्थळी ठाण मांडून आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नदी पात्रालगत संवेदनशिल परिसर म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे धरण स्थळी व नदी पात्रालगत जमावबंदीचे आदेश आहेत. नगर व नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी सोडण्याबाबत होणारा राजकीय विरोध पाहता मुळा धरणातून पाणी सोडताना संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने चोख बंदोबस्त नेमला असल्याची माहिती मिळाली आहे.

मुळा धरणामध्ये २२ हजार ८०० दलघफू इतका पाणी साठा आहे. त्यापैकी २ हजार १०० दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुळा धरणाचे सर्व ११ दरवाज्यातून पाणी जायकवाडी धरणाकडे वाहणार आहे. मुळा पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याबाबत सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. पोलिस, महसूल प्रशासनासह लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना जमावबंदी आदेशाचे अवलोकन करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासह महावितरण विभागाकडून नदी पात्रालगतचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. मुळा धरणातून पाणी सोडण्यापूर्वी सायरन देत नदी पात्रालगतच्या ग्रामस्थ व शेतकर्‍यांना ईशारा दिला जाणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT