अहमदनगर

Nagar : मनपाची करवसुली रझाकारी पद्धतीने? : करदात्यांची पिळवणूक

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : सराफ बाजारातील दुकानमालकाला एकाच मालमत्तेसाठी महापालिकेने दोन वेगवेगळ्या नावांनी मालमत्ताकराची बिले पाठविली आहेत. दुकानदाराने दुसर्‍या नावाने आकारलेला कर भरण्यास असमर्थता दाखविली; मात्र 'आता दुसर्‍या नावाने आलेला करही भरा, पुढच्या वेळी एकाच नावाने कर भरावा लागेल,' असे अजब आश्वासन वसुली अधिकार्‍याने त्यास दिले. वसुली अधिकार्‍याने सदर 20 वर्षांपूर्वीचे बांधकाम अवैध ठरवून पुन्हा 48 हजार 771 रुपयांचा दंडही या दुकानदारास ठोठावला आहे. महापालिकेच्या या रझाकारी वसुलीसमोर करदात्याने मात्र हात टेकले आहेत.

सराफ बाजारात सि. स. नं. 3051 ही मिळकत 1999 मध्ये नागेश रंगनाथ डावरे यांच्याकडून लक्ष्मण जगन्नाथ शहाणे यांनी खरेदी घेतली. खरेदीनंतर लक्ष्मण शहाणे यांनी नगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून जून 2002 साली रीतसर परवानगी घेऊन दुकानाचे बांधकाम केले. त्यानंतर 2013 साली अलका प्रकाश मुंडलिक यांनी या दुकानाची खरेदी घेतली. त्या मिळकतीच्या खरेदी दस्तावरून महावितरण व महापालिकेकडे नावनोंदणी केली. मात्र, या दुकान मिळकतीवर अलका प्रकाश मुंडलिक व चंपाबाई गोंविद डावरे अशा दोन नावांनी महापालिकेकडून वेगवेगळ्या करपावत्या देण्यात आल्या. डावरे यांच्या नावाने येणारा कर मुंडलिक यांनी भरण्यास असमर्थता दाखविली.

मात्र, महापालिकेच्या वसुली अधिकार्‍यांनी मुंडलिक यांना विश्वासात घेऊन, 'आपण डावरे यांचा कर भरल्यास पुढील वेळी एकाच नावाने कर भरावा लागेल,' असे सुचविले. याप्रकरणी महापालिकेच्या वसुली अधिकार्‍यांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट 2022 रोजी असणार्‍या एक लाख 17 हजार 80 रुपयांच्या थकबाकीपोटी अलका मुंडलिक यांनी मनपाच्या शास्तीमाफीच्या योजनेत 44 हजार 880 रुपये भरले. त्यानंतर वसुली अधिकार्‍यांनी मुंडलिक यांना बांधकाम अवैध असल्याचे सांगून पुन्हा 48 हजार 771 रुपयांचा दंड ठोठावला.

संबंधित मिळकत 2013 साली खरेदी केलेली आहे आणि त्याआधीचे मालक शहाणे यांनी 2002 साली तत्कालीन नगरपालिकेची परवानगी घेऊनच बांधकाम केले होते, असे त्यांच्याकडील दाखल्यावरून दिसते. मात्र, महापालिका वसुली आधिकार्‍यांनी अलका मुंडलिक यांच्या दुकानाचे 2002चे बांधकामच अवैध ठरवून मागील 20 वर्षांपासूनचा दंड आकारला आहे. सुमारे 12 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या दुकानमालकास मनपाच्या वसुली अधिकार्‍यांकडून सहकार्य होत नसून आर्थिक व मानसिक पिळवणूक करण्यात येत आहे, असा आरोप मुंडलिक यांच्याकडून केला जात आहे.

मालमत्ता थकबाकीधारकांना विविध प्रकारे थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहन देते. मात्र नियमित कर भरणार्‍यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. खरेदीपूवीची थकबाकी नाइलाजास्तव भरूनही 2002 साली झालेले बांधकाम अवैध ठरवून दंड ठोठावण्यात आला आहे. तो अन्यायकारक असून याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागणार आहे.

– अलका प्रकाश मुंडलिक, सराफ बाजार, अहमदनगर

संबंधित मिळकतधारकाला कराच्या दोन पावत्या येत असतील तर सविस्तर माहिती घेऊन एक पावती रद्द करण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात येईल. जर मिळकती दोन असतील तर त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

– राकेश कोतकर, प्रभाग अधिकारी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT