करंजी; पुढारी वृत्तसेवा : जोपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत आमदार, खासदारांसह कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश करू दिला जाणार नाही. नेते मंडळींच्या डोळेझाकपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशा स्वरूपाचा बोर्ड पाथर्डी तालुक्यातील मिरी बसस्थानका जवळील मुख्य चौकात लावण्यात आला आहे. हा बोर्ड आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आरक्षणाशिवाय गावात नेते मंडळींना प्रवेश बंदी, अशा स्वरुपाचा बोर्ड लावणारे मिरी जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.
आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, तसेच इतर अनेक समाजांचा आरक्षणाचा लढा सुरू आहे. या आरक्षणाच्या लढाईमुळे अनेक राजकीय नेत्यांची चांगलीच कुचंबणा झाली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना विविध समाजाच्या रोशाला सामोरे जावे लागत असून, काही ठिकाणी राजकीय नेत्यांसह आमदार, खासदारांना गावबंदी करण्यात आली आहे.
आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रातून सर्वच गावागावातून जनजागृती झाल्यामुळे अनेक वेळा राजकीय नेत्यांना गावकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागतेय. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने आता राजकीय नेत्यांना प्रचार करणे सुरू करावे लागणार आहे. मात्र, ठिकठिकाणी आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनल्यामुळे राजकीय नेत्यांसमोर या प्रश्नातून मार्ग कसा काढावा आणि गावात जाऊन लोकांना मते कशी मागावी यासाठी आरक्षण प्रश्नावर काहीतरी योग्य तोडगा काढावा लागणार आहे. अन्यथा आरक्षण आगामी निवडणुकीत राजकीय नेत्यांची डोकेदुखी होऊ शकते.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी गावातही आता सकल मराठा समाजातर्फे फ्लेक्स लावून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून 50 टक्केच्या आत आरक्षण द्यावे, अशा मागणीचा फ्लेक्स गावात लावण्यात आला आहे.
हेही वाचा