अहमदनगर

तब्बल 118 नगरकरांचीं घरे ओढ्या-नाल्यावर

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगर शहर व उपनगरातील 45 ओढे-नाले बुजवून रस्ते व इमारती बांधल्याचे समोर आले आहे. त्यात ओढ्यातच लेआऊट मंजूर करण्यात आल्याचा प्रकारही समोर आला. आता महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल 118 जणांनी ओढ्या-नाल्यात इमारती बांधल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात अतिक्रमण काढण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ उपायुक्तांना दिलेल्या अहवालात मागितली आहे. तसा, अहवाल नगररचना विभागाने उपलोकायुक्तांना दिला आहे.

शहरात ओढ्या-नाल्यात अतिक्रमण करून बांधकामे व रस्ते तयार केल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी घुसते. ओढ्या-नाल्यातील अतिक्रमण काढून नैसर्गिक प्रवाहाला वाट मोकळी करून द्यावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यावर महापालिकेने नाशिक येथील एका संस्थेला शहरातील ओढ्या-नाल्याचे सर्वेक्षण करण्याचे काम दिले होते. त्यात शहरात 45 ओढे-नाले असल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हाधिकार्‍यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश देऊनही महापालिकेने कार्यवाही केली नाही. तक्रारदार चंगेडे यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली.

याबाबत दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली होती. महापालिकेने लोकायुक्तांना दिलेल्या अहवालात अतिक्रमण काढण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागविली. दरम्यान, महापालिका नगररचना विभागाकडून शहरातील ओढ्या-नाल्यामध्ये अतिक्रमण करून पक्के बांधकाम करणार्‍या नागरिकांची प्रथमदर्शनी प्रारूप यादी तयार करण्यात आली आहे.

त्यात विविध भागांतील सुमारे 118 जणांचा समावेश आहे. संबंधित अतिक्रमणधारकांना नगररचना विभागाकडून नोटिसा पाठविण्यात येत आहेत. त्या सर्व अतिक्रमणधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून, त्यानंतर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नगररचना विभागाने उपायुक्तांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

सावेडी उपनगरातील अतिक्रमण

सावेडी, सूर्यानगर, तुळजा भवानीनगर, भगवान बाबा चौक, अक्षदा कॉलनी, शिवनगर, गावडे मळा, लेखानगर, सावेडी, मोकाशी वस्ती, आरोह कॉलनी, अयोध्यनगर, गंधे मळा, सुडके मळा ते सीना नदी, भुतकरनगर, धर्माधिकारी मळा, आनंद शाळा, सावेडी परिसर, रासनगर पूल, कैलास हौसिंग, नगर-मनमाड रोड, सिव्हिल हाडको, मार्कंडेय सोसायटी, तारकपूर, विवेकानंद शाळा, पत्रकार वसाहत ते सारडा कॉलेज ते चिंतामणी हॉस्पिटल, शिंदे मळा, ताठे मळा, भुतकरनगर, काशिद हॉस्पिटलजवळील बाजू, भगत मळा.

सारसनगर व केडगाव

रामवाडी, रामवाडी रोड, सारसनगर पुलालगत, भिंगार नाला, सोलापूर रोड, सारसनगर पूल ते व्हिडिओकॉन कंपनी ते औसरकर मळा, विनायकनगर, खोकरनाला रेल्वे स्टेशन, आगरकर मळा, नेप्ती रोड, हॉटेल अर्चना पाठीमागील बाजू, सोनेवाडी पूल परिसर, केडगाव अमरधाम परिसर.

जिल्हाधिकार्‍यांनी आदेश देऊनही मनपा प्रशासनाने कार्यवाही केली नाही. मनपा प्रशासनाकडून वारंवार सेवा-शर्थीचा भंग केला जात असून, कर्तव्यात कसूर केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनपा ओढ्या-नाल्यातील अतिक्रमणांबाबत कागदी घोडे नाचवीत आहे. मनपा प्रशासनाच्या विरोधात थेट मंत्रालयात जाऊन आंदोलन करणार आहे.

– शशिकांत चंगेडे, ज्येष्ठ नागरिक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT