अहमदनगर

नगर : पुणतांबेत दीड लाख भाविकांची मांदियाळी

अमृता चौगुले

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : धाकट्या आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी सुमारे दीड लाख भाविकांनी योगीराज चांगदेव महाराज समाधीचे दर्शन घेतले. बुधवारपासूनच पायी दिंड्यांसह विठ्ठल नामाच्या गजराने मंदिर परिसरासह रस्ते दुमदुमले. यंदा भाविकांची गर्दी कमी दिसली. अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने खरिप पेरण्या खोळंबल्याचा परिणाम यंदा यात्रेवर दिसला. पहिल्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनानंतर धाकट्या एकादशीला योगीराज चांगदेव महाराजांच्या दर्शनानंतर आषाढीची वारी पूर्ण होते, अशी वारकर्‍यांमध्ये भावना व आख्यायिका असल्याने या एकादशीला भाविक येथे मोठी गर्दी करतात.

पहाटे 3 वाजता विठ्ठल- रखुमाई, चांगदेव महाराज मूर्तीस अभिषेक व महापुजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनास खुले केले. गोदावरीच्या पवित्र स्नानाची पर्वणी साधून भाविकांनी दर्शनास रांगा लावल्या. सकाळी 8 वाजेनंतर गर्दीत वाढल्याने मंदिरापासून 1 कि.मीपर्यंत लागलेल्या रांगा सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होत्या. काशी विश्वनाथ, दत्तात्रेय, सोमेश्वर, आदिशक्ती मुक्ताई मंदिरात भाविकांची गर्दी दाटली होती. नगर, नाशिक, व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गावातून शेकडो पायी दिंड्या आदल्या दिवशी व एकादशीच्या दुपारपर्यंत आल्या. यामुळे पुणतांब्यास जोडणारे रस्ते भगव्या पताका, टाळ, मुर्दुंग व विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमले. विविध संघटना व मंडळांनी दिंड्यातील भाविकांना फराळ वाटप करून स्वागत केले.

खासगी प्रवासी वाहतुकीसह श्रीरामपूर, कोपरगाव एसटी आगाराने यात्रेनिमित्त जादा बसेस सोडल्या. रेल्वे फाटक वारंवार बंद झाल्यामुळे वाहनांची गर्दी वाढली. वाहतुकीस खोळंबा झाला. वाहनांच्या रांगाच- रांगा लागल्या. अनिरुद्ध बापू अकॅडमी च्या स्वयंसेवकांनी गर्दी नियोजनासाठी पोलिसांना सहकार्य केले. यावेळी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, बाळासाहेब संचेती, पंकज ठोंबरे, सुधाकर जगताप, ज्ञानेश्वर टेके, दिनकरराव भोरकडे, सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर जाधव, केशव मोरे, बंडू साबळे आदी उपस्थित होते.

गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह यंदा वैजापूरमध्ये
श्रावण पंचमीपासून सुरू होणारा राज्यातील प्रसिद्ध असलेला यंदाचा 176 वा सद्गुरु गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर येथे होणार असल्याचे सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी कीर्तनानंतर जाहीर केले. यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष आ. रमेश बोरणारे व सहकार्‍यांनी सप्ताहाचे श्रीफळ स्वीकारले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT