कोयता नाचवून लुटणार्‍यांना अटक | पुढारी

कोयता नाचवून लुटणार्‍यांना अटक

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील तेली खड्डा येथे कोयता नाचवत जडीबुटी विक्रेत्याला रक्तबंबाळ करून सोने, मोबाईल व पैसे जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) दोघांना अटक केली. यातील एकजण सराईत गुन्हेगार आहे.

यश सुरेश शिंदे (वय 23, रा. रविवार पेठ, सातारा), अक्षय मधुकर तुपे (वय 21, रा. शनिवार पेठ, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. यातील यश शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार इंदलसिंग चितोडिया (वय 49, रा. राधिका रोड, सातारा) यांना अनोळखी युवकांनी दि. 11 जुलै रोजी सायंकाळी तेली खड्डा परिसरात कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. या घटनेत संशयितांनी दमदाटी, शिवीगाळ करत दहशत माजवली. झटापट करत चितोडिया यांच्या कानातील बाळ्या, मोबाईल व रोख रक्कम असा 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरला. यावेळी मदतीसाठी आलेल्या नागरिकांवर संशयितांनी कोयताही उगारला.

वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेनंतर सातारा शहर पोलिस संशयितांचा शोध घेत होते. संशयितांची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या दोन तासात त्यांची धरपकड करण्यात आली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून जबरदस्तीने चोरलेल्या बाल्या, मोबाईल, पैसे व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. पोनि हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button