कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पीएम किसान योजनेंतर्गत प्रलंबित केवायसी व आधार सीडिंग सात सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा त्यानंतरची प्रलंबित ई केवायसी व आधार सीडिंग ग्राह्य धरली जाणार नाही. पीएम किसान योजनेतून ही नावे रद्द करण्याची कार्यवाही करणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली. पीएम किसान योजनेंतर्गत 2019-20 पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ई केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंद अद्ययावत करणे, या बाबी केंद्र सरकारने अनिवार्य केल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई केवायसी पूर्ण करणार नाहीत, तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाहीत, त्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार आहेत.
ई केवायसीकरिता मे, जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत कृषी विभागामार्फत मोहीम राबविण्यात आली होती. परंतु अद्याप तालुक्यात मोठ्या प्रमाणात ई-केवायसी प्रलंबित आहे. वारंवार संपर्क करूनही केवायसी व आधार सीडिंगसाठी प्रतिसाद मिळत नाही. अशा लाभार्थ्यांची नावे वगळण्यात येतील, तशा सूचना सरकार स्तरावरून देण्यात आल्या आहेत.
शेतकर्यांनी खरीप व रब्बी हंगामात बी-बियाणे व खते घेण्यासाठी आर्थिक मदत म्हणून सरकारकडून पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकर्यांना लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकर्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. या अनुषंगाने पीएम किसान योजनेंतर्गत ही ई केवायसी व बँक खाते आधार संलग्नीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी ते आज करून घ्यावे, असे आवाहन म्हस्के यांनी केले.
हेही वाचा