अहमदनगर

Nagar News : जवळा सीना परिसरात आढळले बिबट्याचे ठसे

अमृता चौगुले

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जवळा सीना परिसरात बिबट्या ठसे असल्याचे निदर्शनात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जवळा परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन सरपंच प्रशांत शिंदे यांनी केले आहे. जवळा परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्री बिबट्याचा वावर असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले त्यानुसार दि 19 सप्टेंबर रोजी जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जवळा परिसरात येऊन पाहणी केली. जवळा परिसरातील सीना भागात शेतकऱ्यांनी दाखवलेले पायांचे ठसे बिबट्याचेच असल्याचे जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सांगितले असून बिबट्याच्या हल्ल्यापासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या तसेच नागरिकांना सतर्कत राहण्याचे आवाहन केले. जवळा परिसरात बिबट्या आल्याचे समजताच शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सबंधित बातम्या:

जवळा येथील सीना नदी परीसरात काही शेतकऱ्यांना बिबट्या आढळला. याची माहिती त्यांनी गावचे सरपंच प्रशांत यांना दिली. माहिती मिळताच सरपंच प्रशांत शिंदे व जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. एम भोसले, वनरक्षक प्रवीण उबाळे, आजिनाथ भोसले, रवी राठोड यांनी संबंधित बिबट्या प्रवण क्षेत्राची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी दाखवलेले पायांचे ठसे बिबट्याचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले व नागरिकांना सतर्कत राहण्याचे आवाहन केले तसेच बिबट्याच्या धोक्यापासून सावध राहण्याच्या उपाय योजना सुचवल्या. यावेळी शेतकरी ग्रामस्थांना बिबट्यापासून नुकसान होण्यापुर्वी वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी पिंजरा बसविण्याची मागणी सरपंच प्रशांत शिंदे यांनी केली आहे.

यावेळी जवळा येथील वन विभागातील अधिकारी प्रवीण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी पवार, दादा वाळुंजकर, सचिन विटकर तसेच परिसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT